ठाणे : महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसरात रुग्णालय उभारण्याकरीता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी राज्याच्या नगरविकास विभागाने ५८ कोटी रुपयांचा निधी दोन वर्षांपुर्वी मंजूर केला असून या रुग्णालयाची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करणाऱ्या ठाणे महापालिकेला रुग्णालयाच्या जागेसाठी अद्याप भुसंपादन करणे शक्य झालेले नाही. नागरीकांच्या विरोधामुळे भुसंपादनात अडचणी येत असल्याचे पालिकेचे म्हणणे असून या संदर्भात ठाणे महापालिका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच पत्र पाठवून रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन येथील भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.
ठाणे महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसराची लोकसंख्या चार ते पाच लाखांच्या आसपास आहे. दिवा शहरातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी ठाणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरात जावे लागते. या पार्श्वभूमीवर पालिकेने दिवा शहरात सात ठिकाणी ‘वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू केले आहेत. या दवाखान्यात नागरिकांना मोफत तपासणी औषध दिली जातात. या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील खूप मोठी आहे. परंतु पुढील उपचारासाठी नागरिकांना इतर शहरांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे दिव्यात रुग्णालय उभारणीची मागणी होत होती. हि बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपुर्वी मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्याच्या नगरविकास विभागामार्फत दिवा परिसरात रुग्णालय उभारण्याकरीता आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी पालिकेला प्राप्त झाला असून त्याचा उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेने
केला आहे.
दोन वर्षांपुर्वी निधी मिळूनही ठाणे महापालिकेला दिवा रुग्णालयाच्या जागेसाठी भुसंपादन करणे शक्य झालेले नाही. दिवा येथील आगासन भागातील २५ हजार चौरस मीटर क्षेत्रावर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. टीडीआर स्वरुपात मोबदला देण्याचा प्रस्ताव पालिकेने बाधितांपुढे ठेवला होता. मात्र, त्यास बाधितांनी नकार दिल्यानंतर पालिकेने रोख रक्कम स्वरुपात मोबदला देण्याचा निर्णय घेऊन तसा प्रस्ताव पालिकेने राज्य शासनाला पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाने भुसंपादनासाठी ५८ कोटी रुपये दिले होते. या जागेच्या भुसंपादनासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. मात्र, त्यास काही नागरिकांच्या विरोधामुळे सर्वेक्षण प्रक्रीया रखडली आहे. सर्वेक्षणाशिवाय मोबदला देऊन भुसंपादन करता येत नसल्याने रुग्णालयाचा मार्ग खडतर असल्याचे चित्र आहे.
दिवा, आगासन भागातील १३.८७ हेक्टर जागेवर विविध कार्यालये उभारण्याचे पालिकेचे नियोजन आहे. यामध्ये रुग्णालय, प्रभाग समिती कार्यालय, अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशन, बसथांबा, १५ मीटर रस्ता, संप पंप हाऊस तसेच इतर सुविधांचा समावेश आहे. यापैकी रुग्णालय आणि रस्ता विकसित करण्यासाठी पालिकेने भुसंपादनासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत पालिका पत्रव्यवहार करीत आहे. दरम्यान, पालिकेने डिसेंबर २०२४ मध्ये ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविले आहे. त्यात दिव्यातील रुग्णालयाची गरज लक्षात घेऊन येथील भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी, तसा अभिप्राय न्यायालयात सादर करुन पुढील प्रक्रिया करावी असे सांगितले असल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.