जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

ठाणे : कळवा, मुंब्रा, दिव्यातील वीज वितरण आणि देयक वसुलीच्या खासगीकरणाविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी शनिवारी बंदची हाक दिली आहे. पारसिकनगर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

कळवा, मुंब्रा तसेच दिवा भागातील वीज वितरण आणि वसुलीचे कंत्राट टोरंटो या खासगी कंपनीला दिले आहे. २६ जानेवारीपासून ही कंपनी काम सुरू करणार आहे. मात्र, या खासगीकरणाला नागरिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे. कळवा, खारेगाव, पारसिक नगर, मुंब्रा, दिवा, शीळ, दिवागाव, देसाईतील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नागरिकांनी समन्वय समिती स्थापन केली आहे. खासगी कंपनीमुळे ग्राहकाला वीज देयकात मोठा भुर्दंड बसणार असून महसुलातही तूट येणार आहे, असे सर्वपक्षीय नेत्यांनी स्थापन केलेल्या समितीचे म्हणणे आहे. टोरंटोच्या भिवंडीतील कारभाराचा वाईट अनुभव असल्याचे कारणही समितीने दिले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. सकाळी साडेदहा वाजता पारसिक येथील ९० फूट रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

वाहतूक बदल

* मुंब्रा बाह्य़वळण तसेच मुंब्रा परिसरातून खारेगावमार्गे कळव्यातील शिवाजी चौकात येणाऱ्या वाहनांना पारसिक रेतीबंदर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने मुंब्रा रेतीबंदर येथून खारेगाव टोल नाकामार्गे वळविण्यात येतील.

* विटावामार्गे येणाऱ्या वाहनांना विटावा जकात नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून ती ऐरोली खाडीपूल, आनंदनगर जकात नाकामार्गे वळविण्यात येतील.

* साकेतमार्गे क्रिक नाक्याकडे जाणाऱ्यांना साकेत भागात प्रवेश बंद करण्यात येईल व वाहने मुंबई-नाशिक मार्गावर वळविण्यात येतील. सिडकोमार्गे येणाऱ्या वाहनांना क्रिक नाका येथे प्रवेश बंद करून ती दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह-डॉ. मूस रोडमार्गे वळविण्यात येतील.

* शासकीय विश्रामगृह येथून कळव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शासकीय विश्रामगृह सर्कलजवळ प्रवेश बंद करण्यात आला असून या मार्गावरील वाहने सेंट्रल मैदान- टपाल कार्यालय- जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गावरून वळविण्यात येतील.

*  अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा वाहतूक बदल लागू राहणार आहे.

Story img Loader