दिवा स्थानकात प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाची दखल दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेऊन दिलेल्या सकारात्मक अश्वासनानी केवळ दिव्यातील प्रवासी नव्हे तर ठाण्यापलीकडच्या स्थानकातून प्रवास करणाऱ्या सगळ्याच प्रवाशांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. वर्षांच्या सुरुवातीलाच झालेल्या आंदोलनामुळे वर्षभरात लोकलच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक होऊन वर्ष अखेरीस सगळी परिस्थिती निणंत्रणात येईल असा समज निर्माण झाला.  मात्र वर्षअखेर या परिस्थितीचा वेध घेत असताना परिस्थिती त्या विपरीत झालेली दिसून येत आहे.

मध्य रेल्वेच्या जलद गाडय़ा लवकरच दिवा स्थानकात थांबतील..दिवा-सीएसटी लोकल सोडण्यास मध्य रेल्वे अनुकूल.. लोकल प्रवाशांचे प्रश्न फास्ट ट्रॅकवर घेण्यात येतील.. दिव्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू केले जाईल. यासारखी आश्वासने २०१५ या वर्षभरात दिवावासीयांना मिळाली. या भागातील खासदार, आमदारांनी तर दिव्यात अवघ्या सहा महिन्यांतच दिव्यातील सुविधांचा अनुशेष भरून काढला जाईल, असे दावेही केले. या वर्षांची अखेर  अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असताना आणि दिव्यात उसळलेल्या जनक्षोभाला वर्षपूर्ती होत असताना या अश्वासनांची पूर्ती झाल्याचे मात्र दिसून येत नाही. त्यामुळे २ जानेवारी २०१५ रोजी दिवा स्थानकात उसळलेला जनक्षोभ आणि आंदोलनाच्या भळभळणाऱ्या जखमांवर अश्वासनांची फुंकर देण्यापलीकडे या व्यवस्थेने काहीच केले नाही, असे चित्र ठसठशीतपणे पुढे येत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये भर गर्दीच्या लोकलमध्ये शिरलेल्या भावेश नकाते या तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची चित्रफीत समाजमाध्यमांतून जगासमोर आली आणि हा मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे सेवा म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र जगासमोर आले. त्यामुळे आश्वासने आणि घोषणांमध्ये रमलेल्या रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे मध्ये रेल्वे प्रवाशांचा प्रवास मृत्यूच्या छायेतून सुरू आहे.

२ जानेवारी २०१५ ची सकाळ..वेळ सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान डोंबिवली जवळच्या ठाकुर्ली स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवला. मध्य रेल्वेच्या लोकलगाडय़ांमध्ये उद्भवणाऱ्या सामान्य बिघाडाचा हा प्रकार असल्याने याची कोणतीही कल्पना रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना देण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. यामुळे दिवा स्थानकात लोकल गाडय़ांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये मात्र असंतोष निर्माण झाला. तासभर फलाटावर उभे राहूनही एकही गाडी येत नसल्याने प्रवाशांमध्ये चलबिचल सुरू झाली. त्याच वेळी मध्य रेल्वेच्या दुसऱ्या जलद मार्गावरून मात्र एकामागोमाग एक अशा जलद गाडय़ा वेगाने जात असल्याचे या प्रवाशांच्या निदर्शनात आले. यामुळे राग अनावर झालेल्या दिवा स्थानकातील प्रवाशांनी थेट रेल्वे रुळांवर उतरण्याचा निर्णय घेतला. दुर्लक्षिततेच्या वागणुकीमुळे संतप्त झालेल्यांचा हा जमाव हिंसक रूप धारण करू लागला. येणाऱ्या गाडय़ांवर रुळांवरील दगडांचा वर्षांव या जमावाने केला. हजारो प्रवासी एकाच वेळी रेल्वे रुळावर उतरल्याने रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची पुरती तारांबळ उडली. तोपर्यंत ठाकुर्ली स्थानकातील बिघाड दुरुस्त करून गाडय़ा दिवा स्थानकात पोहोचल्या होत्या. या गाडय़ांना दिवा स्थानकात प्रवाशांनी रोखून धरले. तर जलद मार्गावरून सीएसटीकडे जाणाऱ्या गाडीवर दगडफेक झाल्याचे वृत्त समजल्याने मोटरमनच्या संघटनांनी सीएसटी स्थानकात आंदोलन सुरू केले. त्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा पूर्णपणे कोलमडून पडली होती. अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ाही त्यामुळे कल्याणपलीकडच्या स्थानकात अडकून पडल्या होत्या. तुटपुंज्या पोलीस कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणातही आणता येईना. प्रवाशांचा रोष पाहून पोलिसांना सौम्य लाठीमार करण्याची परिस्थिती उद्भवली. त्यामुळे प्रवाशांचा संताप अधिक वाढला आणि परिसरातील वाहनांना आग लावण्यापर्यंत हा जमाव हिंसक झाला. दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या प्रकरणी मध्यस्ती करण्याची वेळ आली. लोकल प्रवाशांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याबरोबरच हे प्रश्न फास्ट ट्रॅक पद्धतीने सोडवण्यात येतील असा शब्द प्रभू यांनी दिला. दिवा-सीएसटी लोकलच्या मागणीकडेही लक्ष देण्याबरोबरच ही सेवा सुरू करण्याचे आदेश त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या जलद लोकल गाडय़ांनाही दिवा स्थानकात थांबा देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सुचवले.

दिवा स्थानकात प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाची दखल दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेऊन दिलेल्या सकारात्मक अश्वासनानी केवळ दिव्यातील प्रवासी नव्हे तर ठाण्यापलीकडच्या स्थानकातून प्रवास करणाऱ्या सगळ्याच प्रवाशांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. वर्षांच्या सुरुवातीलाच झालेल्या आंदोलनामुळे वर्षभरात लोकलच्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक होऊन वर्षांखेरीज सगळी परिस्थिती निणंत्रणात येईल असा समज निर्माण झाला. स्थानिक खासदार आणि आमदारांनीही आता प्रश्न लवकरच सुटणार असा देखावा निर्माण केला. पत्रकार परिषदांमधून दिवा लोकल, जलद गाडय़ांना थांबा देण्याच्या निर्णयांवर छातीठोक उत्तरे देऊ लागले. मात्र वर्षअखेर या परिस्थितीचा वेध घेत असताना परिस्थिती त्या विपरीत झालेली दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये डोंबिवली स्थानकातून प्रवास करणाऱ्या भावेश नकाते या तरुणाचा गाडीतून पडून मृत्यू झाला. तर मध्य रेल्वेच्या दिवा आणि कळवा स्थानकादरम्यान गर्दीच्या बळीची संख्याही कमालीची वाढू लागली आहे. भावेशच्या निमित्ताने मध्य रेल्वेच्या अपुऱ्या गाडय़ांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. पुन्हा रेल्वेमंत्र्यांनी यावर लक्ष घालणार असल्याचे अश्वासन दिले. मात्र परिस्थिती जैसे थेच असल्याने रेल्वे प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  दिव्यामध्ये रेल्वेची पुरेशी जागा आणि तयार फलाटही आहेत. तांत्रिक गोष्टींचा बागुलबुवा उभा करून रेल्वे प्रशासन या अश्वासनांची पूर्ती करण्याची टाळाटाळच करत आहे. जागा आहे, मात्र मानसिकताच नसल्याने उपनगरीय प्रवाशांना दिलासा मिळत नसल्याचा सूर प्रवासी संघटनांकडून लावला जात आहे. तर जलद लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिवा स्थानकात निर्माण केले असून त्यामुळे प्रवाशांना काही अंशी समाधान मात्र मिळत आहे. दिव्याच्या आजारावर मुळासकट उपचार करण्याकडे मात्र प्रशासन आजूनही लक्ष देण्यास तयार होत नसल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

दिव्यातील अश्वासनपूर्तीमुळे परिस्थिती बदलेल.

मध्ये रेल्वेच्या मार्गावरील २५ टक्क्यांहून अधिक अपघात कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान होत असून त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक अपघात कोपर ते मुंब्रादरम्यान होत असल्याचे रेल्वेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे दिवा स्थानकातून सोडणारी लोकल दिल्यास मुंब्रा, कळवा आणि ठाण्यातील प्रवाशांना त्याचा लाभ होऊ शकेल. सध्या डोंबिवलीकडून येणाऱ्या गाडीत दिव्यातील प्रवासी कसेबसे चढत असले तरी मुंब्रा स्थानकात मोठी कसरत करावी लागते, तर कळव्यात एकही प्रवासी चढू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गर्दीमुळे अपघाताची परिस्थितीही या स्थानकांमध्ये अधिक आहे. दिवा लोकलमुळे परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल होऊ शकेल.

दिव्यात प्रतीक्षा पोलीस ठाण्याची..

दिवा स्थानकातील २ जानेवारीच्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाच्या अपुऱ्या ताकदीचीही पुरती प्रचीती आली. तीन ते चार लाख लोकसंख्या असलेल्या दिवा शहराचा भार मुंब्रा पोलीस ठाण्यावर येत असल्याने दिव्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची त्रेधातिरपीट उडते. रेल्वे पोलिसांची कर्मचारी संख्याही कमी असल्याने दिवा शहराला स्वतंत्र पोलीस ठाणे देण्याची मागणी जोर धरू लागली होती. रेल्वे सुरक्षा दलाचे कार्यालय दिवा स्थानकात असले तरी गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मात्र ही मंडळी लक्ष घालताना दिसून येत नाही. त्यामुळे गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांची गरज प्रवाशांना भासते. रेल्वेतील सोनसाखळी चोरीचे मोठे रॅकेट या भागात कार्यारत असून त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात यंदाच्या वर्षी स्वतंत्र पोलीस ठाण्याची घोषणाही गृह खात्याकडून करण्यात आली होती. वर्षअखेरीस दिवा शहरात पोलीस ठाणेही उभे राहू शकलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षी स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरजही व्यक्त होऊ लागली आहे.

दिवावासीयांच्या अपेक्षा..

*मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेची दिवा-सीएसटी सेवा तात्काळ सुरू करावी.

*मध्य रेल्वेच्या जलद गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा.

*कोकण आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतात जाणाऱ्या सगळ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना दिवा स्थानकात थांबा देण्यात यावा.

*दिवा स्थानकाच्या फलाटांची देखभाल दुरुस्ती, खाद्यपदार्थाचे स्टॉल, आरक्षण केंद्र, तिकीट खिडक्यांची संख्या वाढवणे, पाण्याची आणि  स्वच्छतागृहांची प्रत्येक स्थानकावर व्यवस्था.

*दिव्यातील फाटक बंद करून रेल्वे रूळ ओळांडणारा पादचारी पूल आणि रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा.

*मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हर्बर मार्ग आणि कोकण रेल्वे अशा चारही मार्गाना जोडणाऱ्या दिवा स्थानकाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार  या  स्थानकाची अत्याधुनिक दर्जाच्या सुविधांसह देखभाल दुरुस्ती व्हावी.

Story img Loader