शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी शिळफाटा रस्त्यावरील वाहन कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या रस्त्याच्या काही भागात मोकळे असलेले रस्ता दुभाजक बंद केले आहेत. या बंद दुभाजकामुळे शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या गृहसंकुलातील विद्यार्थी, पालक यांना फेरफटका मारून शालेय बससाठी विद्यार्थ्यांना पोहचवावे लागते. हीच परिस्थिती शाळा सुटल्यानंतर असते असे पालकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि पुलाचे काम विनाअडथळा पार पडावे म्हणून प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गाने वळविण्यात आली आहे. तरीही गुरुवारी रात्री अधिक संख्येने वाहने एकाचवेळी पलावा चौक दिशेने आल्याने पलावा चौकाच्या दुतर्फा वाहनांच्या रांंगा लागल्या होत्या. या कोंडीचा पूल उभारणी कामात कोणताही अडथळा आला नाही. शुक्रवारी दिवसभर वाहतुक सुरळीत होती.

शिळफाटा रस्त्याच्या दुतर्फा अनेक भव्य गृहसंकुले आहेत. या गृहसंकुलातील मुले शाळेसाठी परिसरात, डोंबिवली, कल्याण भागात जातात. या गृहसंकुलांच्या समोर रस्ता दुभाजक मोकळे असल्याने यापूर्वी शाळेच्या बस, विद्यार्थी वाहू लहान वाहने थेट सोसायटीच्या प्रवेशव्दारावर येऊ शकत होती. परंतु, निळजे रेल्वे पुलाच्या कामासाठी शिळफाटा रस्ता बंद करण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला. त्यानंतर या रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी, वाहन चालकाने एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत जाऊ नये म्हणून वाहतूक विभागाने अनेक गृहसंकुलांसमोरील रस्ता दुभाजक सिमेंटचे ब्लाॅक टाकून सोमवारपर्यंत बंद केले आहे. त्यामुळे या गृहसंकुलातील नोकरदारांंची वाहने वळसा घेऊन बाहेर पडत आहेत. वळसा घेऊन सोसायटीत येत आहेत.

शाळकरी मुलांच्या बस सोसायटीपासून दूरवर थांबत आहेत. त्यामुळे सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी पालकांना मुलांना शाळेत सोडण्यासाठी मागील दोन दिवसांपासून कसरत करावी लागत आहे, अशी माहिती या भागातील पालकांनी दिली. हा त्रास पाच दिवसांचा असल्याने आम्ही याविषयी काही तक्रार करत नाही. फक्त या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची रहिवाशांची मागणी आहे.

शिळफाटा रस्ते बाधितांना यापूर्वीच भरपाईचा मोबदला शासनाने मंजूर केला आहे. तो मोबदला देण्यास शासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे बाधित शेतकरी आपली जमीन रस्तारूंदीकरण आणि काँक्रीटीकरण कामासाठी जमीन देण्यास विरोध करत आहेत. या गोंधळाचा फटका परिसरातील नव्या गृहसंकुलांमधील रहिवाशांना बसत आहे. पावसाळ्यापूर्वी निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे काम रेल्वेकडून पूर्ण होत असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. हेच काम पावसाळ्यात करण्यात आले असते तर प्रवाशांंबरोबर विद्यार्थ्यांचे हाल झाले असते.