स्वत:च्या अंधत्वावर मात करून फिजिओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या वसई येथील डॉ. दिव्या बिजूरने रुग्णसेवा हेच आपले ध्येय मानले आहे.
वसईला राहणाऱ्या दिव्याकडे आपल्यासारखी दृष्टी नाही, मात्र तिच्याकडे एक वेगळा दृष्टिकोन आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंडच्या (एनएबी) साहाय्याने वसई येथील सेंट पीटर्स इंग्लिश हायस्कूलमधून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीत ती अंध मुलांमध्ये महाराष्ट्रातून पहिली आली. त्यानंतर मात्र घरातील वैद्यकीय पाश्र्वभूमी असल्याने तिनेही याच क्षेत्रात येत फिजिओथेरपीचा मार्ग पत्करला. अंध मुलांसाठी भरविलेल्या एका करिअर गायडन्सच्या कार्यशाळेत दृष्टी नसतानाही उच्च पदावर पोहोचलेल्या अनेकांनी तिला प्रोत्साहन दिले. तेथेच एक डॉक्टर फिजिओथेरपिस्ट होते, त्यांच्याकडे पाहून दिव्यानेही फिजिओथेरपिस्ट होण्याचे ठरविले.
मुंबईतील महालक्ष्मी येथून फिजिओथेरपीचा दोन वर्षांंचा खास नेत्रहीनांसाठी असलेला अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. फिजिओथेरपी म्हणजे रुग्णांच्या शरीरातील प्रत्येक स्नायू, हाडे, सांधे यांची इत्थंभूत माहिती हवी हे दिव्यालाही कळत होते.
मुंबई विद्यापीठातून अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी शिक्षण उपलब्ध नसल्याने मणिपाल सिक्कीम विद्यापीठातून तीने साडे चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. यासाठी तिने विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यासाठी दररोज वसई ते कांदिवली प्रवास केला. त्यानंतर सिक्कीम विद्यापीठातून पदवी मिळून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन आणि युनिव्हसिर्टी ऑफ बर्मिगहॅम येथून तिला डोळस व्यक्तींसोबत कसे शिकायचे याचे प्रशिक्षण मिळाले. याचा तिला पदवी शिक्षण घेताना फायदा झाला.महाविद्यालयातही सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबत बसून ती ९० मुलांमध्ये पहिली आहे.
त्यानंतर तिची प्रॅक्टिस सुरू झाली. वसई येथे दिव्याचे दोन क्लिनिक आहेत. सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा वेळेत गेली ४ वर्षे हे क्लिनिक सुरूआहेत. संवाद साधण्याच्या तिच्या हातोटीमुळे रुग्णांचा ती चटकन विश्वास संपादन करते. आतापर्यंत तिच्याकडे दोन हजाराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
कंटाळा तिच्या शब्दकोशात नाही
दिव्याची आई सुजल व वडील रवींद्र तिच्याविषयी बोलताना सांगतात, मला कंटाळा आला आहे हे वाक्य दिव्याच्या तोंडी आम्ही कधी ऐकलंच नाही. तिच्यासोबत वावरतानाही कोणाला कंटाळा हा शब्दच सुचणार नाही.दिव्याने डॉक्टरकीसोबतच गायकीचेही शिक्षण घेतले आहे. वसईतील निर्मला बर्वे यांच्याकडून तिने शास्त्रीय संगीताचे धडे गिरविले आहेत. त्यानंतर गंधर्व महाविद्यालयातून संगीतातील पदवीही प्राप्त केली आहे. संगीताची आवड असल्याने काही कार्यक्रमांना इतरांना संगत करण्यास ती जाते. ती उत्तम हार्मोनियमही वाजवते.
शिक्षणाची आस कायम
शिकागो येथील हॅडली स्कूल फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने अंधांसाठी अनेक अभ्यासक्रम ऑनलाइन उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर सॅव्ही दिव्याने यातील अनेक कोर्स ए व ए प्लस गुण मिळवून आतापर्यंत पूर्ण केले आहेत. आपल्या क्षेत्रापेक्षा वेगळे काही तरी करायला तिला नेहमी आवडते. फिजिओथेरपीमधील स्पेशल म्यॅन्युअल थेरपीचे शिक्षण दिव्याला घ्यायचे आहे. मात्र अंधत्वामुळे तिला या अभ्यासक्रमासाठी प्रवेश नाकारला जात आहे. न्यूझीलंड येथील थेरपिस्ट ब्रॅण्ड मुलिगन यांनी दिव्याला न्यूझीलंड येथे येण्याचा सल्ला दिला आहे. मात्र क्लिनिकमुळे ते शक्य नसल्याने ती सध्या त्यांच्या पुस्तकांवरच प्रॅक्टिस करत आहे. मात्र फिजिओथेरपीमधील उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न तिने उरी बाळगले असून त्यासाठी मेहनत घेत आहे. तिच्या आई-वडिलांचाही तिला पाठिंबा आहे.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली