महापालिकेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखला जाणारा ‘ड’ प्रभागाचा प्रभाग अधिकारी रवींद्र गायकवाड याला आयुक्त मधुकर अर्दड यांनी निलंबित केले आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात निलंबित होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १६ झाली आहे.
कल्याण पूर्व भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. याविषयीच्या तक्रारी वाढत असताना प्रभाग अधिकारी गायकवाड या बांधकामांवर कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या, तसेच ते लोकशाही दिन व इतर महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. यापूर्वी गायकवाड हे टिटवाळा भागात प्रभाग अधिकारी होते. तेथेही त्यांनी बेकायदा बांधकामांची पाठराखण केल्याने तेथून त्यांची उचलबांगडी केली होती.
डोंबिवलीत ‘ह’ प्रभागात असताना गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडून निलंबित झाले होते. महापालिकेतील एक वरिष्ठ पदाधिकारी आपल्या पाठीशी असल्याने ते मनमानी करीत असल्याची चर्चा आहे. आयुक्त अर्दड यांनी गायकवाड यांचा अहवाल प्राप्त होताच त्यांना निलंबित केले. अद्याप तीन प्रभाग अधिकारी आयुक्तांच्या रडारवर असल्याचे समजते.
टिटवाळ्यात संशयाचा धूर
बेशिस्त महापालिका कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी आयुक्त मधुकर अर्दड यांनी दंडुका उचलल्याने घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले काळे धंदे लपवण्यासाठी विविध उद्योग सुरू केले असल्याचे बोलेल जाते. टिटवाळ्यातील पालिकेच्या ‘अ’ प्रभाग कार्यालयातील मालमत्ता व पाणीपुरवठा विभागाला काल आग लागून कर वसुली, देयक पावती पुस्तके जळून खाक झाली. टिटवाळा भागात राजरोस बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. काही माफियांनी महापालिकेचे भूखंड बळकावले आहेत. या बांधकामांना कर लावण्याचे उद्योग प्रभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केले असल्याचे बोलले जाते. नवीन आयुक्तांकडून या बांधकामांवर कारवाई होऊन चौकशी झाली तर अडचण नको म्हणून टिटवाळा कार्यालयात आग लावण्यात आली की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा