हिंदू धर्मशास्त्र, तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक दिवाकर अनंत घैसास यांचे बुधवारी पहाटे राहत्या घरी झोपेतच निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. दिवाकर घैसास यांनी मुंबई महापालिकेत नोकरी केली. वाचनाची खूप आवड असल्याने नोकरीच्या कालावधीत मराठी, इंग्रजी, संस्कृत, हिंदी भाषेतील हिंदू धर्मशास्त्रावरील ग्रंथ, कागदपत्रांचे त्यांनी अफाट वाचन केले. या ग्रंथावर मराठी, इंग्रजीतून समीक्षण, पुर्नलेखन करीत त्यांनी १४५ हून अधिक अभ्यासपूर्ण ग्रंथांची निर्मिती केली. धार्मिक विचार, शुध्द आचार, साधा स्वभाव ही त्यांची गुणवैशिष्टये होती. कृष्णभक्ती आणि तत्वज्ञान हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. सगुण भक्तीचा विलक्षण अविष्कार त्यांच्या ठायी होता.

अध्यात्म मार्गावरील साधक, जिज्ञासूंना हात राखून न ठेवता मार्गदर्शन करण्याचे बहुमोल कार्य ते करीत होते. दासबोध, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, धर्मसिंधू या ग्रंथांची त्यांनी इंग्रजीतून निर्मिती केली. अलीकडे त्यांचे ‘वाल्मिकी रामायण’ ग्रंथ इंग्रजीतून लिखाणाचे काम सुरु होते. थिऑसॉफिस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. रा. स. भागवत हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. त्यांच्याजवळ दिवाकर यांनी एक तप ब्रम्हविद्येचा अभ्यास केला. त्यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत थिऑसॉफिस्ट सोसायटीची स्थापना झाली. सार्थ भगवद्गगीता, एकनाथांचे भावार्थ रामायण, सार्थ एकनाथी भागवत, सार्थ रुद्राध्याय, तुकारामाची गाथा ही त्यांची उल्लेखनीय ग्रंथनिर्मिती आहे. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे त्यांना डोंबिवली सेवा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwakar ghaisas passes away
Show comments