ठाणे : ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग २ ते ४ च्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानासह ऑक्टोंबर महिन्याचे वेतन पालिकेने दिवाळी पुर्वीच दिले असून त्याचबरोबर शहरातील आशा सेविकांनाही पालिकेने सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांबरोबरच आशा सेविकांची दिवाळी गोड झाली आहे. 

दिवाळी सणाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येते. यंदा २४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले होते. या आदेशानंतर दिवाळीपुर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम पालिकेने सुरू केले होते. यामध्ये वर्ग एक च्या अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदान घ्यायचे नाही असा निर्णय घेतला असून यामुळे वर्ग २ ते वर्ग ४ च्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पालिकेने सानुग्रह अनुदानाच्या रक्कमेसह ऑक्टोबर महिन्याचे वेतन जमा केले आहे. तसेच, आशा सेविकांना देण्यात येणारी सहा हजार रुपयांची दिवाळी भेट दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे आशा सेविका आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा >>>शहापूरच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना हद्दपार

ठाणे महापालिकेचे २ ते ४ या संवर्गातील ६३०० कर्मचारी, शिक्षण विभागातील ७३६ कर्मचारी, ठाणे परिवहन सेवेचे १४९३ कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३६५ कर्मचारी यांना २४ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. तर, ४९२ आशा सेविकांना गतवर्षीप्रमाणेच सहा हजार रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, सानुग्रह अनुदान, दिवाळी भेट तसेच, कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वीच बॅंक खात्यात जमा करण्यात आले. ही सर्व एकत्रित रक्कम सुमारे २२ कोटी रुपये आहे. ठाणे महापालिकेच्या विविध विभागांसाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ पुरवणाऱ्यात येते. या कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण तसेच ऑक्टोबरचे वेतन संबंधित कंत्राटदारामार्फत दिवाळीपूर्वीच करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्याची अमलबजावणी करण्यात आल्याची खात्री विभागप्रमुखांमार्फत करण्यात आली आहे.