यंदाच्या दिवाळी सणाची सुरुवात दूरचित्रवाणीवर झळकणाऱ्या लाडक्या कलाकारांच्या सहवासात ठाणेकरांना साजरी करता येणार आहे. निमित्त आहे गाणी, गप्पा, कविता, किस्से अशा कलाविष्कारांमुळे बहर आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. विराट सामाजिक आणि सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमास दूरचित्रवाणीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये ऋतुजा बागवे, सुहास परांजपे, चिन्मय उदगीरकर, वर्षां दांदळे आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. माधुरी करमरकर, नचिकेत देसाई आणि प्रशांत काळुंद्रेकर आदी गायक कार्यक्रमात आपली गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर करणार आहेत.
’कधी : मंगळवार १० नोव्हेंबर,
’वेळ : सकाळी ६.३० वाजता
’कुठे : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)
अभिनेत्री सीमा देव यांच्याशी गप्पा..
सिनेसृष्टी आणि तारेतारका हे अनेकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. या कलावंतांच्या पडद्याबाहेरील जीवनाबद्दलही तमाम रसिकांच्या मनात उत्सुकता असते. गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांच्याविषयी जाणून घेण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. साहित्य यात्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये मैत्रेय प्रकाशनाच्या ‘सुवासनी’ या पुस्तकाच्या नवा आवृत्तीचे प्रकाशन शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता सीमा देव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सुवासनी हे पुस्तक सीमा देव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. जयश्री देसाई त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
’कधी- शनिवार, ७ नोव्हेंबर, वेळ : ६.३० वाजता
’कुठे-सरस्वती विद्या मंदिर, क्रीडा संकुल, मल्हार सिनेमाजवळ, नौपाडा, ठाणे(प.)