शॉपिंग हा झगमगत्या महानगरी जीवनशैलीचा दैनंदिन अविभाज्य घटक असला तरी दिवाळीच्या निमित्ताने भरणारी खरेदीची वार्षिक जत्रा कायम आहे. दिवाळीच्या निमित्ताने कपडय़ांपासून चीजवस्तूंपर्यंत आणि धान्यापासून मिठायांपर्यंतच्या खरेदीला एकदम तेजी येते. याशिवाय फटाके, रांगोळी, कंदील, रोषणाईचे दिवे यांचा बाजारही भरू लागतो. राहिलंच तर दिवाळसणाच्या मुहूर्तावर दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर, गाडी यांच्या खरेदीचेही बेत आखले जातात. गेल्या काही वर्षांत रूजलेल्या मॉल संस्कृतीने दिवाळी निमित्त बाजारात भरणाऱ्या खरेदीच्या उत्साहात भर घातली आहे. त्यात आता ऑनलाइन शॉपिंगची नवलाई अवतरली आहे. दुकानात जाऊन थेट खरेदी करण्यापेक्षा अशी व्हच्र्युअल खरेदी काहीशी स्वस्त असल्याने स्मार्ट ग्राहक आता हा पर्याय निवडू लागले आहेत. विशेषत: तरूणवर्ग अशाप्रकारच्या ऑनलाइन शॉपिंगला पसंती देताना दिसत आहेत. ठाणे परिसरातही शॉपिंगची अनेक परिचित ठिकाणे आहेत. उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या शहरांमध्ये परिसरातील ग्राहक खरेदी करताना दिसतात. दिवाळीनिमित्त ठाणे परिसरात भरलेल्या शॉपिंगनामक भुलभुलय्याचा हा सचित्र आढावा..
बाजाराचा नवा कल
शलाका सरफरे
दिवाळी हा सण दिव्यांचा.. घराघरांत दिवाळी साजरी केली जाते. ही दिवाळी अधिक देखणी करण्यासाठी आकाशकंदील, पणत्या, दिवे, तोरण आणि विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. आकाशकंदील, पणत्यांचे विविध प्रकार, तोरण, रांगोळीचे स्टीकर, घरातली सजावटीचे साहित्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत. भाऊबीज-पाडवा या दिवसांच्या निमित्ताने भेटवस्तूंची देवाण-घेवाण होते. दिवाळीच्या निमित्ताने होणारी खरेदी अधिक सोपी व्हावी म्हणून बाजारातील नवीन ट्रेंड्सचा हा वेध..
रांगोळी अधिक सोयीस्कर.
यंदा पांढरी रांगोळी दहा रुपये किलो, तर रंगीत रांगोळी २५ ते ४० रुपये किलो दराने बाजारात उपलब्ध आहे. तसेच विविध १४ प्रकारच्या रंगांमध्ये रांगोळी असल्याने त्यातील गुलाबी, लाल, पोपटी, भगव्या, हिरव्या रंगाच्या रांगोळीला अधिक मागणी आहे. काचेच्या छोटय़ा ग्लासच्या मापाने दिवाळी सणासाठी विक्रेत्यांनीही दहा रुपयांच्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करून ठेवल्या आहेत. रांगोळी काढण्यासाठी प्लॅस्टिकचा कोन, पणती, शुभ लाभ, शुभ लक्ष्मी आदींसह विविध नावांचे प्लॅस्टिकचे साचे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यात रांगोळी भरून ते साचे जमीन, फरशीवर उठवल्यास त्यातील अक्षरे, नक्षीनुसार रांगोळी रेखाटली जाते. ठाण्यातील बाजारपेठांमध्ये साच्यांमध्येही वैविध्य येते. पारंपरिक चौकोनी साच्यांबरोबरच नक्षीदार रोलर(लंबकार नळी), चाळण्या असे विविध पर्याय यंदा उपलब्ध आहेत. रांगोळीचे साचे १० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत बाजारात मिळतात.
आता प्लायवुड, हार्डबोर्डच्या, कचाकडी तयार रांगोळ्यांचा नवा ट्रेन्ड आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांपासून आखीव-रेखीव रांगोळ्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. या रांगोळ्या उडून जाण्याचीही भीती नाही. त्याचप्रमाणे या रांगोळ्या फोल्डिंग स्वरूपात तयार होत असल्याने त्यांचे आपल्या आवडीनुसार विविध आकारही तयार करता येतात. या रांगोळ्या भेट देण्यासाठीही खरेदी केल्या जातात. आजकाल इमारतींमध्ये दररोज रांगोळी घालण्यापेक्षा याच रांगोळीचे दररोज विविध आकार करूनही त्यात वैविध्य आणता येतं.
मेणाच्या पणत्यांचा उत्तम पर्याय..
दिवाळीत खरे तर परंपरेने तेलाच्या पणत्या लावण्याची प्रथा असते. आता वापरायला सोप्या मेणाच्या दिव्यांनी त्यांची जागा घेतली आहे. मोठय़ा रांगोळ्यांमध्ये सजवायला आणि दीपोत्सवांमध्ये हमखास असे मेणाचे दिवे दिसतात. काचेच्या आकर्षक बाटल्यांमध्ये रंगीत मेण ओतून तयार केलेले दिवे तर लक्षवेधी दिसतात. या दिव्यांमध्ये सुगंधी द्रव्य टाकून सुगंधी दिवेही तयार करण्यात येतात. याशिवाय फ्लोटिंग दिवे, टी लाइट्स, हँगिंग दिवे असेही प्रकार लोकप्रिय होत आहेत. मॉलमधल्या ‘होम डेकॉर’ भागात चक्कर मारली तर असे किती तरी नवीन दिव्यांचे प्रकार दिसतील. दिवाळीला एका कोपऱ्यात एका बाऊलमध्ये मेणाचे दिवे ठेवण्याचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागला आहे. अॅल्युमिनियमच्या लहान वाटय़ांच्या पारंपरिक दिव्यांबरोबरच केवळ मेणाचे एखाद्या गोळ्याप्रमाणे दिसणारे दिवेदेखील बाजारात आले आहेत. याची किंमत दहा रुपये एक याप्रमाणे आहे.
ऑनलाइन बाजारातही तेजी
श्रीकांत सावंत
ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळांवरून मिळणारी आकर्षक सूट आणि असंख्य प्रकारचे पर्याय यांमुळे ऑनलाइन खरेदीकडे ग्राहकांचा ओढा आता वाढत चालला आहे. तोच कल यंदाच्या दिवाळीत आणखी वाढल्याचे दिसत आहे. बाजारात होणारी प्रचंड मोठी गर्दी, हव्या असलेल्या वस्तूसाठी करावी लागणारी पायपीट आणि बजेटपेक्षा महागडय़ा वस्तू टाळण्यासाठी खरेदीचा ऑनलाइन पर्याय अधिक सुखकर ठरत असून याकडे तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात वळू लागला आहे. शिवाय ई-कॉमर्स कंपन्यांनी आता मोबाइल अॅपवर खरेदीचे वेगळे दालन खुले केल्याने खरेदीचा ओघ या दिशेलाही वळू लागला आहे.
यंदाच्या दिवाळीत नव्या ऑफर काय?
फ्लिपकार्ट : यंदाच्या दिवाळीमध्ये फ्लिपकार्ट या संकेतस्थळाने मोबाइल अॅपवरून दिवाळी खरेदी करणाऱ्यांसाठी वेगळे दालन खुले करून दिले आहे. ‘हॅप्पी दिवाली सेल’ असे या भागाचे नाव असून या माध्यमातून खरेदी करणाऱ्यांना ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान दागिने, घरगुती वस्तू, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि कपडे यावर १० टक्केची सूट जाहीर करण्यात आली आहे. शिवाय खरेदी करा आणि जिंका स्वरूपाच्या योजना फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी जाहीर केल्या आहेत.
स्नॅपडिल : दिवाळी म्हटले की दिव्यांचा सण हे समीकरण लक्षात घेऊन स्नॅपडिल या संकेतस्थळाने ‘फेस्टिव्ह लाइटिंग’ हा विभाग सुरू करून यामध्ये दिवाळीच्या दिव्यांपासून भेटवस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. लाइटिंग ऑफर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, दिव्यांच्या माळा, टॉर्च आणि बल्बच्या खरेदीवर ६० टक्क्यांपर्यंत भरघोस सूट देण्यात आली आहे, तर पारंपरिक पणत्या, दिवे, शोभेचे दिवे, मातीचे दिवे, मेणाचे दिवे यांची खरेदीही या माध्यमातून करता येणार आहे. त्यामध्ये ३० टक्क्यापर्यंत सूट देण्यात येत आहे, तर विविध प्रकारच्या आकर्षक मेणबत्त्यासुध्दा यामध्ये उपलब्ध आहेत.
अॅमेझॉन : दिवाळीची ऑनलाइन खरेदी लक्षात घेऊन अॅमेझॉन संकेतस्थळाने ‘द ग्रॅण्ड दिवाली बाझार’ ही संकल्पना राबवली आहे. यामध्ये दिवाळीसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एका क्लिकवर मिळू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दिवाळीसाठी कंदील, दिवे, कपडे, दागिने, महिलांची सौंदर्य प्रसाधने, पारंपरिक कपडे, भेटवस्तू, मिठाई आणि चॉकलेट्स, महालक्ष्मीच्या मूर्ती, पूजेचे साहित्य या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दर्जा उत्तम आणि मनाचे समाधान
ऑनलाइन पद्धतीमुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. ५० ते ७५ टक्के सवलत असल्याने वस्तू कमीत कमी दरात मिळत आहेत. वस्तूंच्या दर्जामध्येदेखील कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे ही पद्धत उपयुक्त वाटत आहे. घरातील सर्वासाठी मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जाते. कपडे, फराळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची रोख खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन पर्याय अधिक सुखकर वाटतो आहे.
-मयूर दिघे, कल्याण</p>
तोरण.
पूर्वी, झेंडू-डहाळीची तोरणे दरवाजावर लटकवली जायची. परंतु, सध्या याची जागा नकली तोरणे, चायनीज तोरणांनी घेतली आहे. काच, कुंदन आणि गोंडय़ाची शैली असलेली राजस्थानी तोरणेही बाजारात उपलब्ध आहे. सध्या विविध रंगांचा लख्ख प्रकाश देणारे एलईडी तोरण बाजारात उपलब्ध झाले असून डमरू आणि पणत्यांचा आकार असलेल्या तोरणांची मागणी वाढली आहे. तसेच विविध रेडीमेड फुलांची तोरणे ही उपलब्ध आहेत. एलईडी तोरण ४५० रुपयांपासून उपलब्ध असून डमरू-पणत्यांचे, झुमर तोरण ७०-१५० रुपयांपर्यंत मिळत आहे. सध्या बाजारात फटाक्यांचा आकार असलेली आणि आवाज करणारी तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. याची किंमत २५० रुपयांपासून सुरू आहे. ठाण्यातील जांभळी नाका, राम मारुती रोड येथील बाजारात ही तोरणे उपलब्ध आहेत. सोनेरी कागदाच्या तोरणांपासून ते पार कवडय़ांच्या तोरणांपर्यंत सगळ्या प्रकारची तोरणं बाजारात उपलब्ध आहेत. सोनेरी रंगाच्या तोरणामुळे घराला पारंपरिक लुक मिळतो. लोकरीच्या तोरणांमध्ये वेगवेगळ्या रंगांची भरपूर रंगसंगती पाहायला मिळेल. या लोकरीच्या तोरणांची किंमत दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत आहे. कवडय़ांची आणि कुंदनांच्या तोरणांमध्ये मॉडर्न आणि पारंपरिक लुकचं फ्युजन पाहायला मिळते. त्यामुळे ती सुंदर दिसतात. त्यांची किंमत साडे तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत आहे.
आवाजापेक्षा आतषबाजीवर भर
दिवाळी आणि फटाके हे समीकरण इतके घट्ट झाले आहे की, फटाक्याविना दिवाळी साजरी केल्याचा आनंदच मिळत नाही. मात्र, पूर्वापार चालत असलेल्या आवाजी फटाक्यांच्या परंपरेला अलिकडच्या काळात छेद मिळाला आहे. पर्यावरणाबाबतची जागरूकता आणि ध्वनीप्रदुषणाबाबतची मर्यादा यांमुळे दणदणाट करणाऱ्या सुतळी बॉम्ब, लवंगी फटाके, तोटे यांना बाजूला सारून आकाश उजळवून टाकणाऱ्या विविधरंगी फटाक्यांची मागणी केली जात आहे.
बेन्टेन, छोटा भीम, पॉवररेंजर्स..
लहान मुलांसाठी आकर्षण असणाऱ्या बेन्टेन, छोटा भीम आणि पॉवररेंजर्स या कार्टूनमधील पात्रांच्या नावाने हे फटाके बाजारात उपलब्ध आहेत. हे फटाके लावल्यानंतर साधारण १२ फूट ते १५ फूट (इमारतीचा एक ते दीड मजला) वर जाऊन ते फुटतात आणि त्यातून विविध रंग बाहेर पडतात. बेन्टेन हा फटाका लाल आणि हिरवा या रंगात तर छोटा भीम फटाका चंदेरी रंगात आणि पॉवररेंजर्स हा फटाका लाल, चंदेरी व हिरवा अशा रंगांमध्ये उपलब्ध आहे.
रंग बदलणारी फुलपाखरे
हा फटाका लावल्यानंतर त्यातून क्रमश: विविध रंग बाहेर पडतात. लाल, पिवळा, हिरवा असे विविध रंग कलर्स चेंजिंग बटरफ्लायमधून बाहेर पडतात. त्याचप्रमाणे हा फटाका आवाजविरहित असल्याने तो ग्राहकांच्या पसंतीस पडतो.
भुईचक्र
‘म्युझिकल व्हील’ म्हणजेच ‘चकरी’चा फटाका. ‘भुईचक्र’ या नावाने हा फटाका सर्वश्रुत आहे. हा फटाका लावल्यानंतर भुईचक्र जमिनीवर गोल फिरते आणि त्यातून ‘ची’ असा शिट्टीचा आवाज बाहेर पडतो. त्याचप्रमाणे ‘चायना व्हील’ हा फटाका भुईचक्राचाच प्रकार आहे. हा फटाका लावल्यानंतर भुईचक्र जमिनीवर तीनदा गोल फिरते.
क्रॅकलिंग पाऊस
क्रॅकलींग पाऊस हे ‘पाऊस’ या फटाक्याचे विकसित रूप म्हणता येईल. क्रॅकलींग पाऊस हा फटाका लावल्यानंतर त्यातून सोनेरी रंगाचा पाऊस बाहेर पडतो आणि त्यासोबतच ‘करकर’ असा क्रॅकलिंग आवाजही येतो.याशिवाय ‘कलर्स स्मोक फाऊंटन’, ‘जेट फाऊंटन’, ‘गोल्डन व्हीसल’, ‘हनिमून क्रॅकलिंग’, मॅजिक क्रॅकलिंग अशा पाऊसवजा फटाक्यांचीही बाजारात रेलचेल आहे.
पल्र्सड्रॉप
पर्ल्सड्रॉप या फटाक्यामध्ये भुईचक्र आणि पाऊस या दोन वेगळ्या फटाक्यांचे मिश्रण आहे. पर्ल्सड्रॉप हा फटाका लावल्यानंतर त्यामधून प्रथम पाऊस बाहेर पडतो. त्यानंतर पाऊसामधून पाच भुईचक्र बाहेर पडून ती जमिनीवर गोल फिरू लागतात. पर्ल्सड्रॉप हा फटाका फोडल्यानंतर भुईचक्र आणि पाऊस हे दोनही फटाके लावल्याचा आनंद लहान मुलांना मिळतो.
बारा कलर
बारा कलर हा फटाका जमिनीवर लावला जातो. फटाका लावल्यानंतर फटाक्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्यानंतर हा फटाका थेट आकाशात जाऊन फुटतो आणि बारा प्रकारचे विविध रंग बाहेर फेकतो.
नॉव्हेल्टी
हवेत जाऊन फुटणाऱ्या फटाक्यांमध्ये नॉव्हेल्टी या फटाक्याचीही चलती आहे. नॉव्हेल्टी फटाक्याच्या पाकिटात दोन स्वतंत्र फटाके मिळतात. हा फटाकाही जमिनीवर लावण्यात येतो. फटाका लावल्यानंतर त्याचा आवाज आपल्याला ऐकायला येतो. त्यानंतर हा फटाका आकाशात जाऊन फुटतो. हा फटाका लाल, हिरवा, पिवळा, संमिश्र रंग अशा विविध रंग प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
गेल्या वर्षीच्या फटाक्यांच्या मागणीच्या तुलनेत यंदा दहा ते वीस टक्क्य़ांची वाढ झाली आहे. फटाके उत्पादकांकडून फटाक्यांचा पुरवठा मुबलक होत असल्याने फटाक्यांची मागणी आणि त्याच्या पुरवठय़ाचा समतोल राखणे शक्य होते. तुलनेने आवाज कमी असणारे किंवा ध्वनीविरहीत फटाके, वेगवेगळे रंग बाहेर फेकणारे फटाके आदी फटाक्यांना बाजारात विशेष पसंती मिळत आहे. ध्वनीविरहित फटाके रात्री दहानंतरही फोडणे शक्य होते
– सतीश पिंगळे, घाऊक व्यापारी, कोपरी, ठाणे (पू.)
सणाची खास खरेदी
किन्नरी जाधव
वसुबारस ते भाऊबीज.. अतिशय उत्साहाचा हा दिवाळसणाचा आठवडा. या सणाचे विशेष आकर्षण असते ते घराघरांत तयार केल्या जाणाऱ्या दिवाळी फराळाचे. दिवाळीच्या काही दिवस आधीच गृहिणींमध्ये फराळ बनवण्याच्या तयारीची सुरुवात होते आणि साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होते. काळ बदलत गेला, त्यानुसार नोकरी आणि घर सांभाळणाऱ्या गृहिणींनी सण साजरे करताना त्यात सोयीस्कर पर्यायाचा अवलंब केला. यात दिवाळीचा तयार फराळ मिळू लागला आणि आधुनिक गृहिणींना हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला..
लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, साटोऱ्या, चिरोटे यांसारखे तयार फराळाचे पदार्थ बाजारात पूर्वीपासूनच मिळत आहेत. दिवसेंदिवस खाद्यपदार्थाचे भाव वाढत असताना तयार फराळाच्या किमती वाढणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षी असलेल्या तयार फराळाच्या किमतीपेक्षा यंदाच्या किमतीमध्ये फारसा फरक नाही. सर्वच दुकानांत तयार फराळाच्या सारख्याच किमती पाहायला मिळत आहेत. २८० पासून ४५० रुपयांपर्यंत तयार फराळ बाजारात उपलब्ध आहे.
तयार पिठांचा उत्तम पर्याय
पूर्वी हे फराळाचे पदार्थ केवळ वर्षांतून एकदाच दिवाळीचे औचित्य साधून बनवले जात होते. फराळ घरी करायचा म्हणजे सुरुवातीपासूनच त्यासाठी लागणारी पिठे, अनारसे तयार करण्यासाठी काही दिवस आधीच तयारी करावी लागते. पण वेळेचे गणित सध्या चुकू लागले आहे. त्यामुळे अलीकडे तयार पीठ बाजारात उपलब्ध झाले आहे.
पणत्यांचे असंख्य पर्याय
माती, चिनीमाती, पत्रा यापासून बनलेल्या आणि शंख, कोयरी, मोर, मासा, पान, तुळशी वृंदावन तर काही झाडांची प्रतिकृती आणि त्यावर पक्षी अशा विविध आकारांच्या व रंगांच्या लहान-मोठय़ा पणत्या बाजारात उपलब्ध आहेत. याशिवाय कासवाच्या आकाराच्या पणत्या, काही फुलांच्या आकाराच्या पणत्याही ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. पूर्वीपेक्षा बाजारात पणत्यांमध्ये अनेक आकर्षक विविधता असल्याने ग्राहक खरेदीच्या संभ्रमात आहेत. केशरी-हिरवा, पिवळा-लाल अशा विविध रंगसंगतीच्या पणत्या, त्यावर चमकीने केलेली नक्षी, टिकल्यांनी केलेली सजावट अशा कलाकुसरीने घडविलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत. अलीकडे मातीच्या पणत्यांच्या जोडीला रंगीबेरंगी चायना पणत्या बाजारात आल्या आहेत.
घरी उटणे बनवणे झाले सोयीस्कर
अभ्यंगस्नान म्हटले की उटण्याशिवाय पर्याय नाही. मात्र केवळ परंपरा म्हणून हे उटणे दिवाळीच्या दिवसांत खरेदी केले जाते. उटण्याचा शरीरासाठी, त्वचेसाठी आयुर्वेदिक उपयोग काय आहे, हे फार कमी जणांना माहीत असते. ठाण्याच्या बाजारात काही दुकानदारांनी उटण्याच्या विक्रीसोबत अभ्यंगस्नान म्हणजे काय? अभ्यंग कसे करावे? उटण्याचे शरीरासाठी असणारे फायदे अशी माहिती ग्राहकांसाठी दुकानांमध्ये लिहिली आहे. तयार उटण्यासोबत उटणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. यात चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखणारा नागरमोथा, निरोगी त्वचेसाठी उपयुक्त असणारा बावचा, त्वचा उजळ करणारी संत्रासाल, विषद्रव्ये नाहीशी करणारी मंजिष्ठा, त्वचेवरील डाग कमी करणारी अनंतमूळ यांसारखे घरी उटणे तयार करता येतील असे काही पदार्थ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
तयार किल्ल्यांसोबत शौर्यगाथा
छोटे मातीचे किल्ले म्हणजे दीपावली हे दृढ समीकरण होते. पूर्वी दिवाळीच्या सुट्टीमध्ये विरंगुळा म्हणून किल्ले बनविले जायचे. मातीपासून किल्ले बनविण्याचा छंद जोपासला जायचा. धावपळीच्या युगात तयार किल्लय़ांना मागणी वाढली आहे. एक फुटापासून तीन फूट उंचीपर्यंतचे आकर्षक किल्ले ठाण्याच्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यावर मातीचे तयार असलेले मावळे, भाजीवाली, पाण्याला जाणारी स्त्री, विहीर, संत मंडळी, सैनिकांची छोटय़ा प्रतिकृती सर्व काही तयार मिळतात. यंदा यामध्ये भर पडली आहे ती कथांच्या आधारे बनवलेल्या मूर्त्यांची. शिवाजी महाराजांची आग्य््रााहून सुटका, अफजल खानाचा वध, शिवाजी महाराज पालखीतून जाताना अशा विविध कथा या तयार किल्ल्यांच्या माध्यमातून मूर्तीबद्ध केलेल्या पाहायला मिळतात. किल्ल्याचे महाद्वारही आकर्षक व सुबक आहे. बाजारांमध्ये या किल्ल्यांची किंमत ३०० ते १००० एवढी आहे. या किल्ल्यांना करडा रंग देऊन त्यावर भगवा झेंडा फडकताना ते अधिक आकर्षक दिसून येतात.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून
शेतकऱ्यांसाठी मदत
कल्याण : राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कल्याणमधील मंगेशी ड्रीम सिटी हाऊसिंग फेडरेशनमधील तरूणांनी व्हॉट्सपच्या माध्यमातून एक गट तयार केला. या गटाचे ८४ सदस्य झाले. या तरूणांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत करा म्हणून आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केवळ व्हॉसट्सपच्या माध्यमातून या तरूणांनी २ लाख १६ हजार ६५० रूपये जमा केले. या तरूणांनी हा निधी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे या नाम फाऊंडेशनाला दिला आहे.
‘स्मार्ट सीटी’साठी आता
शैक्षणिक संस्थांची मदत
ठाणे: स्वच्छ शहरे, स्मार्ट सीटी घडवत असताना तेथील लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून ठाणे शहरातील नागरिकांचा आणि तेथील विद्यार्थ्यांचे सहकार्य मिळवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. शहरातील विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट सिटी आणि स्वच्छ भारत आभियानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी ठाणे महापालिका महापौर संजय मोरे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधत त्यांना विद्यार्थ्यांमध्ये या विषयी जागृती घडवण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धांसारख्या स्पर्धेचे आयोजन करत शहरात जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नागरिकांची सुजाण पिढी घडविण्याचे काम करीत असतानाच, सामाजिक कर्तव्य म्हणून सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता दुत होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. स्वच्छतेचे बीज विद्यार्थ्यांच्या बालमनावर रुजवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.