ठाणे : दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटाने आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांच्या नावाने दिवाळी पहाट साजरी करणार आहेत. मासुंदा तलावाच्या काठाजवळ आणि राम मारूती रोड परिसरात एकूण आठ कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. त्यासंदर्भाचे अर्ज नौपाडा पोलीस ठाण्यात प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या कालावधीत ठाणेकरांना कार्यक्रमांकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मासुंदा तलाव परिसरातील राजवंत ज्वेलर्स दुकानासमोरील भागात शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्याकडून आनंद चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेमार्फत मागील काही वर्षांपासून दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर राम मारूती रोड परिसरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रम आयोजित केले जात होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यामुळे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या आयोजनावरून वाद झाला होता. आता राजवंत ज्वेलर्स दुकानासमोरील मार्गावर शिवसेना शिंदे गटाकडून एका संस्थेच्या माध्यमातून आयोजन केले जात आहे. तर राजन विचारे यांनी गडकरी रंगायतन चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. ठाण्याच्या माजी महापौर तसेच शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्याकडून गेल्यावर्षीपासून चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित केले जात आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तरुणांना कार्यक्रमाच्या ठिकाणी ओढण्यासाठी चढाओढ लागलेली असते.

हेही वाचा – ठाण्यातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

हेही वाचा – Geeta Jain: “भाजपाकडून भ्रष्टाचारी उमेदवाराला तिकीट, मी गुवाहाटाली जाऊनही…”, गीता जैन यांची टीका

यावर्षी विधानसभा निवडणुका आहेत. ठाणे शहर मतदारसंघामधून ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची लढत भाजपचे संजय केळकर यांच्यासोबत आहे. तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढत आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघातून प्रताप सरनाईक हे लढत आहेत. यावर्षी देखील ठाकरे गटाने आनंद चॅरिटेबल ट्रस्ट, शिंदे गटाच्या युवा सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तर मिनाक्षी शिंदे यांनीही चिंतामणी चौकात कार्यक्रम आयोजनासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि माजी नगरसेवक राजेश मढवी यांच्या देखील संस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali for by parties at masunda lake in thane ssb