डोंबिवली: डोंबिवली जवळील ठाकुर्ली-चोळे गावात मंगळवारी दिवाळी सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी बलिप्रतिपदा असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरातील गोधनाला सजवटून, रंगरंगोटी केली होती. वाजतगाजत गावातून मिरवणुकीने गोधन गावच्या हनुमान मंदिराजवळ आणण्यात आले. तेथे पेंढा पेटवून गोधनला खेळविण्यात आले.
बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकरी गाई, बैल, म्हशी यांना सजवितो. त्यांची मिरवणूक काढून गावाच्या प्रवेशव्दारात पेंढा पेटवून त्यांना खेळविले जाते. या दिवशी गोधनाला पेंढ्याचा धूर दिला की त्यांना वर्षभर कोणतीही बाधा होत नाही, अशी शेतकऱ्यांची भावना आहे. डोंबिवली, ठाकुर्ली, चोळे परिसराचे नागरीकरण झाले आहे. मोठे गृहप्रकल्प, बंंगले पध्दत आकाराला आली आहे. तरीही डोंबिवलीतील चोळे, जुनी डोंबिवली, देवीचापाडा, नवापाडा भागात अनेक शेतकऱ्यांनी आपले गोधन सांभाळून ठेवले आहे.
हेही वाचा… दिवाळी सुट्टीत नाट्यगृहांमध्ये बालनाट्यांचा महोत्सव
दिवाळीत बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकरी आपल्या गोधनाला आकर्षक पध्दतीने सजवितो. गावातील गोधनाची एकत्र ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. चोळे, मोठागाव, नवापाडा, देवीचापाडा भागात अशाप्रकारे गोधनाची मिरवणूक काढून त्यांची पूजा करण्यात आली. चोळे गावीतल काही शेतकऱ्यांनी आपल्या बैलाच्या पाठीवर राम मंदिराची प्रतिकृती काढून जय श्री रामचा नारा दिला होता. चोळे गावामध्ये माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यासह ग्रामस्थांच्या पुढाकाराने गोधनाची पूजा केली जाते. गावातील सार्वजनिक ठिकाणी आपल्या गोधनाला नेऊन तेथे त्यांना झुंजविले जाते.