मराठी साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक म्हणजे कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष ज्याप्रमाणे प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो तद्वत मराठी साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक सर्व क्षेत्रांतील वाचकांच्या नव-साहित्याविषयीच्या इच्छापूर्ण करतो, असे प्रतिपादन स्वायत्त मराठी विद्यापीठाचे समन्वयक व ग्रंथसखाचे विश्वस्त श्याम जोशी यांनी केले. दिवाळी अंकाविषयीच्या व्याख्यानपर कार्यक्रमात ते रविवारी सायंकाळी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मराठी साहित्यात दिवाळी अंकाला शंभर वर्षांची परंपरा आहे. यंदा ठाण्यातील व्यास क्रिएशन्सच्या वतीने ही परंपरा व त्या काळातील विशेष लेखांचे संकलन करून प्रतिभा हा दोन भागांतील दिवाळी विशेष अंक प्रकाशित करण्यात आला आहे. १९०९ ते २०१५ या वर्षांतील निवडक १०६ लेखांचे संकलन करीत प्रतिभा या दिवाळी अंकांचे दोन भाग करण्यात आले आहेत. दिवाळी अंकाची सुरुवात अगदी आठ महिने आधीपासून होत असते. पूर्वी काही कविता, एखाद्या कादंबरीचा विषय किंवा एखाद-दुसरा लेख, काही व्यंगचित्रे असे दिवाळी अंकात मर्यादित स्वरूपाचे साहित्य असायचे. बदलता काळ आणि तंत्रज्ञानाप्रमाणे त्यांचे स्वरूपही बदलले. आता विषय ठरवून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येते आणि मगच दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागले आहेत. असे जोशी म्हणाले. विशेष म्हणजे दिवाळी अंक हा केवळ दिवाळीपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्या विषयाचा एक प्रकारे संदर्भ ग्रंथ या निमित्ताने प्रकाशित होत आहे. अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न त्यामुळे सुटला असून काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी १९०९ साली लावलेले हे दिवाळी अंकाचे रोपटे इतका मोठा वृक्ष होईल यावर विश्वासही त्या काळी नसता बसला असे ते बोलताना म्हणाले.
ठाणे महापौर चषक छायाचित्र स्पर्धा ‘आविष्कार-२०१५’
आजपासून कलाभवनमध्ये प्रदर्शन