ठाणे : डुबी रेतीच्या व्यवसायाचे यांत्रिकीकरण केल्यास या व्यवसायावर अवलंबून असलेले मुंब्रा, कशेळी आणि घोडबंदर अशा ३५ गावांतील ३ हजार ग्रामस्थ कुटुंब, कष्टकरी आदिवासी मजुरांची उपजीविका नष्ट होईल. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे गंभीर संकट ओढवेल. त्यामुळे डुबी रेती व्यवसाय बंद करून त्याचे यांत्रिकीकरण करू नका अशी मागणी रेती व्यवसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली आहे.
मुंब्रा-रेतीबंदर, कशेळी ते घोडबंदर या ग्रामीण भागातील स्थानिक भूमिपूत्र पारंपरिकरित्या डुबी रेती व्यवसाय शेकडो वर्षांपासून करीत आहेत. या डुबी रेती व्यवसायाला बंद करून त्याचे यांत्रिकीकरण केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच रेती व्यवसायिकांनी घोडबंदर येथील नागलाबंदरात आंदोलन करून ड्रेजर यंत्राला घेराव घालून यांत्रिकरणाला विरोध केला होता. त्यानंतर रेती व्यवसायिकांचे प्रतिनिधी दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन डुबी रेती व्यवसायिकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या.
हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीतील सोसायटीधारकांचे भाडे करार वाढणार
डुबी व्यवसायावर अवलंबून असलेले ३५ गावांतील ३ हजार ग्रामस्थ कुटुंबांना यांत्रिकीकरणाचा फटका बसणार आहे. डुबी व्यवसायासाठी वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी या भागातून १५ हजार कष्टकरी आदिवासी मजूर उपजीविकेसाठी येत असतात. हा व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवेल, असे रेती व्यवसायिकांचे म्हणणे आहे. मुंब्रा व घोडबंदर खाडीतून पारंपारिक डुबी रेती व्यवसाय करणाऱ्या २०० ते ३०० टन रेतीने भरलेल्या बार्ज घेऊन जात असतात. असे असताना खाडीतून खोली करण्याची अजिबात आवश्यकता नसल्याचा दावाही रेती व्यवसायिकांनी केला. राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि डुबी व्यावसायिकांची एकत्रित बैठक बोलवावी अशी विनंती दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली.