लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : येथील पूर्व भागातील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथे सोमवारी दुपारी डॉ. हेमंतकुमार मिश्रा (५३) यांच्या दवाखान्यात घुसून चार जणांनी त्यांना येथे ‘वैद्यकीय व्यवसाय करतो की, नेतेगिरी करतो,’ असे प्रश्न उपस्थित करत बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉ. मिश्रा यांना दुखापत झाली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डॉ. मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन चार जणांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. २० ते २५ वयोगटातील हे तरूण होते, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. सागाव येथील भाऊराव धर्मदर्शन इमारतीत डॉ. मिश्रा यांचा दवाखाना आहे.
आणखी वाचा-ठाणे : घोडबंदरमध्ये तीन दिवस अवजड वाहतुक बंद
पोलिसांच्या प्राथमिक अहवालातील माहिती अशी, सकाळच्या वेळेतील रुग्णसेवा केल्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान डॉ. मिश्रा दवाखाना बंद करून घरी निघाले होते. तेवढ्यात एक तरूण आला. त्याने एक रुग्ण येत आहे. थोडा वेळ थांबा असे सांगितले. रुग्ण येत असल्याने डॉ. मिश्रा त्या रुग्णाची वाट पाहत बसले.
तेवढ्यात रुग्णाचा निरोप देणारा तरूण आणि त्याच्या सोबतीला आणखी एक जण दवाखान्यात आले. त्यांनी काही कळण्याच्या आत डॉ. मिश्रा यांना शिवागाळ करत ‘तुम्ही येथे वैद्यकीय व्यवसाय करता की नेतेगिरी करता,’ असा प्रश्न उपस्थित करत मारहाण सुरू केली. तेवढ्यात अन्य दोन जण दवाखान्यात आले. चौघांनी मिळून डॉ. मिश्रा यांना नखाने बोचकारत, शिवीगाळ करत मारहाण केली. एकाने लाकडी दांडक्याने डॉक्टराना मारहाण केली. त्यानंतर तेथून ते निघून गेले. चेहरा, हात, मान आणि पायाला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी वैद्यकीय उपचाराचे पत्र देऊन डॉ. मिश्रा यांना पालिकेच्या रुग्णालयात पाठविले. तेथे उपचार घेऊन आल्यानंतर डॉ. मिश्रा यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.