भगवान मंडलिक, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रुग्णालयात जखमी, कोणी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला रुग्ण कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खासगी रुग्णालयात दाखल झाला की संबंधित रुग्णालयाला त्या रुग्णाची माहिती (मेडिकल लीग केस) तात्काळ जवळच्या किंवा तो रुग्ण ज्या भौगोलिक भागातून आला आहे. त्या पोलीस ठाण्याला रुग्णालय प्रमुखांना प्रथम द्यावी लागते. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीतील पोलीस ठाण्यांमधील पोलीस तो रुग्ण ज्या भागातून आला त्याची भौगोलिक हद्द शोधा. तो रुग्ण, रुग्णालय ज्या परिसरात असेल तेथे तुम्ही तुमचा वैद्यकीय प्राथमिक अहवाल द्या, असे सांगून डॉक्टरांची हैराणी करत असल्याच्या तक्रारी कल्याण डोंबिवली शहरांमधील काही डॉक्टरांनी केल्या आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : चुलीचा धूर घरात आल्याने दोन जणांवर कोयता, चॉपरने जीवघेणा हल्ला

रुग्णालयात मारहाण झालेला, अपघातात जखमी, विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अशा वेगळ्या प्रकारातील रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याची पहिली माहिती कायद्याने स्थानिक पोलीस ठाण्यांना देणे रुग्णालय प्रमुखांना बंधनकारक असते. आता ऑनलाईनच्या माध्यमातून या प्रक्रिया झटपट होणे आवश्यक आहे. रुग्णाची ऑनलाईन माहिती स्थानिक पोलीस ठाणे स्वीकारण्यास तयार होत नाही. तेथे रुग्णालयातील डॉक्टर किंवा अन्य कर्मचारी पाठविला तर पोलीस प्रथम त्याची उलट चौकशी सुरू करतात. रुग्णाचा अहवाल पाहून तो रुग्ण कोणत्या भागातील आहे. त्या भागातील पोलीस ठाणे कोणते. तो रुग्ण कोणत्या भागात राहतो याची माहिती घेऊन त्या भागातील पोलीस ठाण्यात संबंधित रुग्ण अहवाल देण्याचे सांगून स्थानिक पोलीस ठाण्यात त्या रुग्णाची नोंद करुन घेण्यास नकार देत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील ‘एम्स’ रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी दिली.

स्थानिक पोलीस ठाण्याने हा गुन्हा शून्य प्रक्रियेने नोंद करुन तो गुन्हा रुग्ण ज्या भौगोलिक हद्दीत राहतो किंवा अपघात ज्या भागात घडला आहे त्या पोलीस ठाण्यात वर्ग करणे आवश्यक आहे. अशी कोणतीही प्रक्रिया न करता अलीकडे डॉक्टरांना भौगोलिक हद्द शोधा आणि तुम्ही त्या पोलीस ठाण्यात जाऊन रुग्णाचा वैद्यकीय अहवाल (मेडिकल लीगल केस) द्या, असे सांगून आपली जबाबदारी झटकत आहेत, असे कल्याण, डोंबिवली खासगी रुग्णालय चालकांनी सांगितले.

दुसऱ्या पोलीस ठाण्यात गेले की तेथे तेथील अंमलदार ही आमची भौगोलिक हद्द नाही. जखमी रुग्ण हा उल्हासनगरच्या रुग्णालयातून तुमच्या रुग्णालयात दाखल झाला आहे. तो रुग्ण पुणे येथील आहे. तुम्ही पहिले उल्हासनगर येथे जा असे सांगून आपली जबाबदारी टाळतो. पोलीस ठाण्यातील दुरुत्तरे आणि येऱझऱ्यांमुळे कल्याण डोंबिवलीतील डॉक्टर पोलिसांच्या कृती विषयी नाराजी व्यक्त करत आहेत.

पुणे येथील एक महिलेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी कल्याणमध्ये आणण्यात आले. महिलेची तब्येत अधिक झाल्यावर तिला डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयाने स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन त्या महिलेचा वैद्यकीय अहवाल देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही घटना आमच्या हद्दीतील नाही तुम्ही कल्याण पूर्वेत जाऊन ते रुग्णालय कोळसेवाडी की विठ्ठलवाडी हद्दीत आहे हे पाहून त्या पोलीस ठाण्यात अहवाल तेथे जमा करा, असे उत्तर ‘एम्स’ रुग्णालयाच्या डाॅक्टरना दिले. हा गुन्हा शून्य प्रक्रियेने दाखल करुन तुम्ही तो जखमी ज्या भागातील आहे त्या पोलीस ठाण्यात वर्ग करा, असे सांगूनही पोलिसांनी ऐकले नाही, असे डाॅ. शिरोडकर यांनी सांगितले.

याऊलट तुम्ही वैद्यकीय अहवालाच्या एका बाजुला रुग्ण कुठला आहे. तो कोणत्या रुग्णालयातून आला आहे असा एक भाग रुग्णालयाच्या शीर्षपत्रावर छापा, असा सल्ला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रुग्णालय चालकांना दिला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जबाबदारी घेणार नाही, अशा मनस्थितीत पोलीस असल्याने कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे.

अधिक माहितीसाठी साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

” रुग्णालयात अपघाती, आत्महत्येचा प्रयत्न करणारा रुग्ण दाखल झाला की त्याचा वैद्यकीय अहवाल दाखल करुन घेण्यास अलीकडे स्थानिक पोलीस ठाणे तयार होत नाही. डाॅक्टरांना नाहक ते वेगळ्या पोलीस ठाण्यांना फिरण्यास भाग पाडतात. शून्य प्रक्रियेने गुन्हा दाखल होऊन तो वर्ग होऊ शकतो तरीही रुग्णालयांना हा त्रास का दिला जात आहे. वरिष्ठांनी याची दखल घ्यावी.” डॉ. मिलिंद शिरोडकर,  व्यवस्थापकीय संचालक, एम्स रुग्णालय, डोंबिवली

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors in kalyan dombivli harassed by police zws