कल्याण – ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपास पथकाने डोंबिवलीतील ६५ महारेरा घोटाळ्यातील इमारतीमधील सदनिकांची दस्त नोंदणी करू नये, असे पत्र नोंदणी उपमहानिरीक्षकांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिले होते. त्या आदेशाचे उल्लंघन करून कल्याण पश्चिमेतील सह दुय्यम निबंधक-२ यांनी या इमारत घोटाळ्यातील सदनिकांची नियमबाह्य दस्त नोंदणी केल्याचे प्रकरण उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे डोंबिवली, २७ गाव परिसरात ६५ बेकायदा इमारतींची उभारणी करणाऱ्या भूमाफिया, विकासक, वास्तुविशारदांच्या विरुद्ध गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पालिकेच्या नगररचना अधिकाऱ्यांनी रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. या ६५ बेकायदा इमारत प्रकरणाची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असल्याने या इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी करू नये, असे पत्र तपास पथकाचे प्रमुख सरदार पाटील (निवृत्त) यांनी ठाण्याच्या नोंदणी उपमहानिरीक्षकांना दिले होते.

६५ बेकायदा इमारत प्रकरणाची तपास पथकाबरोबर सक्तवसुली संचालनालय (ईडी) स्वतंत्र चौकशी करत आहे. तपास पथक प्रमुख सरदार पाटील, ठाण्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सूचित करूनही कल्याण पश्चिमेतील सह दुय्यम निबंधक-२ कार्यालयातील सह दुय्यम निबंधक जी. बी. सातदिवे यांनी डोंबिवलीतील महारेरा घोटाळ्यातील बेकायदा ६५ इमारतींमधील सदनिकांचे खरेदी, विक्रीची दस्त नोंदणी करून दिली आहे. ६५ प्रकरणातील काही भूमाफियांची दस्त नोंदणी सातदिवे यांनी केल्याच्या तक्रारी आहेत. यामधील काही दस्तऐवज ‘लोकसत्ता’कडे आहेत.

हेही वाचा – प्रस्थापित कामगारांमुळे डोंबिवली पूर्व, कल्याण पश्चिमेला फेरीवाल्यांचा विळखा कायम

डोंबिवलीत पालिका, महसूल विभागाची बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे ६५ भूमाफियांनी डोंबिवली परिसरात ६५ बेकायदा इमारती उभारल्या. या प्रकरणी वास्तुविशारद संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच, पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून नगररचना अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

या बेकायदा इमारत प्रकरणात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने तो पैसा भूमाफियांनी उभारला कोठून, सदनिका विकल्यानंतर तो पैसा माफियांनी जिरवला कोठे, असे प्रश्न निर्माण झाले. शासनाने या प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष तपास पथक स्थापन केले. या बेकायदा व्यवहारातील झिरपलेल्या पैशाचा माग काढण्यासाठी ‘ईडी’ने या प्रकरणात उडी घेऊन चौकशी सुरू केली आहे.

तपास पथकाने आतापर्यंत १० जणांना अटक केली होती. ईडीने दोन वास्तुविशारदांना समन्स बजावले आहेत. जिल्हा मुद्रांक अधिकाऱ्यांनी पथकाच्या आदेशाप्रमाणे दस्त नोंदणी न करण्याचे आदेश कल्याण, डोंबिवलीतील सह दुय्यम निबंधक यांना दिले होेते. गेल्या सहा महिन्यांपासून डोंबिवली, कल्याण पूर्वमधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात ६५ इमारत प्रकरणातील दस्त नोंदणी बंद आहे. ६५ बेकायदा इमारत प्रकरणाचा तपास थंडावल्यामुळे, या प्रकरणाकडे आता कोणाचे लक्ष नाही असा विचार करून कल्याण पश्चिमेतील सह दुय्यम निबंधक सातदिवे यांनी काही दिवसांपूर्वी महारेरा घोटाळ्यातील इमारतींमधील दस्त नोंदणी केल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे काही जागरुकांनी केल्या आहेत.

हेही वाचा – गिरणी कामगारांसाठीची रंजनोळीतील घरे दुरुस्तीअभावी धुळखात, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दुरुस्ती करावी-एमएमआरडीए

चौकशी करू

६५ इमारत घोटाळ्यातील सदनिकांची नियमबाह्य दस्त नोंदणी कोणी सह दुय्यम निबंधक करत असेल तर ते गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला चौकशीसाठी पाचारण केले जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

“६५ इमारत प्रकरणातील दस्त नोंदणी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. तरीही कोणी सह दुय्यम निबंधक अशी दस्त नोंदणी करत असेल तर कागदपत्र उपलब्ध झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.” असे मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण राजपूत म्हणाले.

नारायण राजपूत
मुद्रांक जिल्हाधिकारी

“अशी कोणतीही दस्त नोंदणी आपल्या कार्यालयात केली जात नाही. केलेली नाही.”असे कल्याण – २, सह दुय्यम निबंधक, जी. बी. सातदिवे म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Document registration of flats in maharera scam in dombivli in the office of the sub registrar ssb
Show comments