कल्याण – येथील पश्चिमेतील गोल्डन पार्क भागातील बेतुरकरपाडा येथे राहणाऱ्या एका २७ वर्षांच्या तरुणाला दोन महिन्यांपूर्वी भटका श्वान चावला होता. ही घटना घडली असतानाच, या तरुणाला मांजर चावली. हे दोन्ही प्राणी चावल्यानंतर तरुणाने रुग्णालयात जाण्याऐवजी हे दोन्ही आजार अंगावर काढले. या तरुणाला अलीकडे त्रास सुरू झाल्याने त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी मृत्यू झाला.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ला यांना मृत मुलाच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूसंदर्भात माहिती दिली. ही माहिती डाॅ. शुक्ला यांनी पालिकेच्या प्रसिद्धी पत्रकाव्दारे माध्यमांना दिली आहे. या माहितीप्रमाणे, श्वान चावलेला मृत तरुण हा कल्याण पश्चिमेतील बेतुरकरपाडा भागात कुटुबियांसह राहत होता. दोन महिन्यांपूर्वी तरुण सोसायटीच्या आवारात रात्रीच्या वेळेत फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला श्वान चावला. श्वान चावल्यानंतर पायाच्या भागात रक्त प्रवाह झाला नाही. तसेच श्वान चावल्याने पायावर येणारे श्वानाच्या दाताचे व्रण किंवा तेथे जखम झाली नाही. श्वान चावल्याची गंभीर दखल तरुणाने घेतली नाही आणि तो श्वान चावल्यानंतरची प्रतिबंधक इंजेक्शन घेण्यासाठी पालिका किंवा खासगी रुग्णालयात गेला नाही. दोन आठवड्यांपूर्वी संबंधित तरुण आपल्या मित्राच्या घरी गेला होता. तेथे त्याला मांजर चावली. त्यानंतरही तरुणाने कोणत्याही प्रतिबंधक उपायांचे इंजेक्शन घेतले नाही.
हेही वाचा – अतिक्रमण कारवाईत दुजाभाव ?
१० डिसेंबरपासून रुग्ण तरुणाला डोकेदुखी, अंगदुखीचा त्रास सुरू झाला. त्याच्या घशाला सारखी कोरड पडायला लागली. तरुणात ही लक्षणे दिसू लागल्याने त्याला पहिले कल्याणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णाची प्रकृती विचारात घेऊन त्याला पालिकेच्या कल्याणमधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात, त्यानंतर मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आवश्यक प्रभावी उपाचार करूनही तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. कस्तुरबा रुग्णालयात तरुणाचा गुरुवारी संध्याकाळी सात वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आपला एकुलता एक मुलगा भटका श्वान चावल्याने मृत पावला. याला जबाबदार कोण, असा प्रश्न करत मृत मुलाच्या वडिलांनी भटक्या श्वानांचा पालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी माध्यमांसमोर केली.
हेही वाचा – ठाणे विभागीय अंतिम फेरी आज; घाणेकर नाट्यगृहात ‘लोकांकिकां’चे सादरीकरण
े
भटक्या श्वानांच्या हल्ल्यात अलीकडे अंबरनाथमध्ये लहान मुलांवर भटक्या श्वानांनी हल्ला केला होता. टिटवाळा येथे भिक्षेकरी महिलेवर चार भटक्या श्वानांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. भटक्या श्वानांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांना भटक्या श्वानांच्या उपद्रवाला सर्वाधिक सामोरे जावे लागते. याविषयीच्या नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.