लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर : भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही भटक्या श्वानांमुळे नागरिक भितीच्या छायेत आहेत. मुरबाड तालुक्यातील धसई गावात एका सहा वर्षाच्या मुलीवर पिसाळलेल्या श्वानाने हल्ला केला. या हल्ल्यात मुलीला गंभीर इजा झाली असून श्वानाने तिचा जबडा फाडला आहे. या मुलीवर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसात भटक्या श्वानांची वाढलेली संख्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. शहरी भागात उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भटक्या श्वानांच्या हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आहेत. येथील स्थानिक पालिका प्रशासन भटक्या श्वानांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र शहरासोबतच आता ग्रामीण भागातही भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मुरबाड तालुक्यातील धसई गावात एका सहा वर्षीय मुलीवर भटक्या श्वानाने हल्ला केल्याने तीचा जबडा फाटला आहे.

आरुषी कनोजिया असे या मुलीचे नाव असून ती धसईच्या घोलप गावात राहते. गुरुवारी संध्याकाळी ती घरात खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या श्वानाने तिच्यावर हल्ला चढवला. यात तिचा जबडा पूर्णपणे फाटला असून श्वानाने तिचे अक्षरशः लचके तोडले आहेत. या घटनेनंतर आरुषीला आधी मुरबाडच्या उपजिल्हा रुग्णालय घेऊन नेण्यात आले होते. मात्र तिथल्या डॉक्टरांनी तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.

सध्या तिच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागात भटक्या श्वानांचे हल्ले आणि संख्या रोखण्यासाठी कोणतीही योजना नसल्याने धसई परिसरात श्वानांचा सुळसुळाट झाला असून याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी यानंतर ग्रामस्थांमधून होते आहे.