भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे कल्याण-डोंबिवलीकर हैराण असताना पाच मुलांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना कल्याण पूर्वेत नुकतीच घडली. यामुळे या दोन्ही शहरांतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात धनलक्ष्मी सोनावणे (८), वेदांत शिंदे (६), भविष्य दिवेकर (६), काजल पवार (१०), समृद्धी माघडे (१०) या मुलांना भटक्या कुत्र्याने चावा घेतला. या मुलांना त्यांच्या पालकांनी खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र रेबिजवरील लस उपलब्ध नसल्याने मुलांचा रक्तस्राव सुरूच राहिला.

त्यानंतर पालकांनी मुलांना कल्याण-डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या प्रयत्नानंतर या मुलांना आवश्यक ती लस उपलब्ध करून देऊन उपचार करण्यात आले.

लससाठी पालकांची धावाधाव 

रात्रीच्या वेळी लस उपलब्ध नसल्याने काही पालकांनी मुलांना ठाण्याच्या दिशेने घेऊन जाण्याची तयारी केली, मात्र शास्त्रीनगर रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नाही, असे उत्तर या पालकांना देण्यात आले. त्यामुळे जखमी मुलांसोबत रुग्णालयात आलेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत नगरसेविका संगीता गायकवाड यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना या घटनेची माहिती दिली. महापौरांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याशी संपर्क साधून या मुलांवर उपचार करण्याचे आदेश दिले. मात्र श्वानदंशानंतर दिली जाणारी दुसरी लस महापालिकेत उपलब्ध नसल्याचे डॉ. रोडे यांनी सांगितले. मुलांच्या उपचारात दिरंगाई होऊ नये यासाठी डॉ. रोडे यांनी खासगी रुग्णालयातून ही लस मागवली. त्यानंतर पुढील उपचार सुरू झाले.

Story img Loader