कल्याण : कल्याणमध्ये एका श्वानप्रेमी महिलेला एका नागरिकाने श्वानांच्या विषयावरून मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या आठवड्यात एका नागरिकाच्या वाहनावर श्वानाने लघुशंका केल्याने वाहन मालक आणि श्वान मालक यांच्यात वाद होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. मागील काही दिवसांपासून श्वान प्रकरणातील तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत येऊन लागल्याने आता माणसांच्या तक्रारींचा तपास करायचा की श्वानांच्या प्रकरणांना प्राधान्य द्यायचे, असे प्रश्न पोलिसांना पडले आहेत.

पूनम अक्षय भोई ( रा. निलगिरी सोसायटी, कल्याण पश्चिम) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. अकरम मुश्ताक शेख असे आरोपीचे नाव आहे. अकरम हा पूनम राहत असलेल्या सोसायटीत राहतो. पूनम आणि तिचे पती अक्षय हे दोघे श्वानप्रेमी आहेत. सोसायटी आवारातील पाळीव, भटक्या श्वानांना ते नेहमी भांड्यात पाणी, थाळीत भोजन ठेऊन सोसायटी आवारात मोकळ्या जागेत खाऊ घालतात. गेल्या आठवड्यात रात्री साडे वाजण्याच्या सुमारास पूनम आणि तिचे पती अक्षय नेहमीप्रमाणे एका थाळीत अन्न ठेऊन ते भटक्या, पाळीव श्वानांना खाऊ घालण्यासाठी सोसायटी आवारात फिरत होते. त्यांनी सोसायटीच्या एका मोकळ्या जागेत अन्नाची थाळी ठेवली. तोपर्यंत भटकी कुत्री तेथे आली नाहीत. बराच उशीर वाट पाहुनही भटकी कुत्री येत नसल्याने भोई दाम्पत्य सोसायटी आवारात उभे होते.

हेही वाचा…कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीच्या घरमालकीणीवर गुन्हा, कल्याण डोंबिवली पालिकेकडून प्रथमच आक्रमक कारवाई

दरम्यानच्या काळात पाऊस सुरू झाला. थाळीत श्वानांसाठी ठेवलेले अन्न खराब होईल म्हणून पूनम यांनी भोजनाची थाळी उचलून ती सोसायटी जवळील जिन्याजवळ पावसाची झड न येणाऱ्या भागात आणून ठेवली. हा प्रकार या सोसायटीत राहणारा रहिवासी अकरम शेख याने पाहिला. त्याने जिन्याजवळ भोजनाची थाळी ठेवण्यास विरोध केला. अशाप्रकारे रस्त्यात अशी थाळी ठेवायची नाही अशी बडबड करून पूनम आणि त्यांच्या पतीला असा प्रकार पुन्हा केल्यास मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा…ठाणे : पाठ्यपुस्तके, गणवेशवाटपास खासगी शाळांचा नकार, ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी यंदाच्या वर्षीही प्रतीक्षा

आम्ही कोणालाही त्रास होणार नाही अशा पध्दतीने श्वानांना भोजन खाऊ घालतो, असे सांगूनही आरोपी अकरम ऐकत नव्हता. त्याने अरेरावी आणि मारण्याची धमकी दिल्याने भोई दाम्पत्याने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.