उल्हासनगरः गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात उल्हासनगर महापालिका प्रशासनाला यश आले आहे. कंत्राटदार मिळत नसल्याने उल्हासनगर शहरातील श्वान निर्बिजीकरण पूर्णपणे ठप्प होते. अखेर नवा कंत्राटदार मिळाल्याने आता श्वान निर्बिजीकरण प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शहरात सुमारे ४ हजार भटके श्वान असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे वेळेत या श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे.
उल्हासनगर शहरात गेल्या काही महिन्यात भटक्या श्वानांची संख्या वाढल्याचे दिसून आले होते. भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकारही वाढले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते. रात्रीच्या वेळी, पहाटे लवकर घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर भटक्या श्वानांकडून हल्ले केले जात होते. त्यामुळे भटक्या श्वानांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात होती. त्याचवेळी उल्हासनगर महापालिका क्षेत्रात निर्बिजीकरण करणाऱ्या संस्थेचा कंत्राट संपल्याची माहिती समोर आली होती.
नवा कंत्राटदार नेमला गेला नसल्याने निर्बिजीकरण प्रक्रिया ठप्प झाली होती. त्यामुळे पालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचा उच्छाद वाढला होता. उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार, उल्हासनगर शहरात सध्या १४ हजार भटके श्वान आहेत. तर २०२३ मध्ये निर्बिजीकरण केंद्र सुरू झाल्यापासून १० हजार श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. तरीही ४ हजार श्वानांचे निर्बिजीकरण करण्यासाठी नव्या कंत्राटदाराला जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरात पुन्हा निर्बिजीकरण प्रक्रियेला वेग येण्याची आशा आहे.
निर्बिजीकरण प्रक्रिया करताना श्वानांवर उपचार
निर्बिजीकरण प्रक्रिया करताना श्वानांवर उपचार करून त्यांना काही काळ पालिकेच्या केंद्रात ठेवले जाते. त्यानंतर त्यांना सुखरूप अधिवासात सोडले जाते. त्यासाठी पालिकेचे केंद्र अस्तित्वात आहे. आता निर्बिजीकरण आणि लसीकरण प्रक्रिया केली जाते आहे.