उन्हाळा सुरू झाला आहे. परीक्षा संपत आल्या आहेत आणि त्याबरोबर शिबिरे, सहली, छंदवर्ग यांची आखणी सुरू झाली आहे. सुट्टीच्या नियोजनामध्ये घरातील माणसांबरोबरच आता ‘श्वानुले’ही सामावले आहेत. श्वानांना होणारी उन्हाची तलखी कमी करण्यासाठी वेगवेगळी उत्पादने दाखल झाली आहेत. पण त्यासोबत निव्वळ सुट्टीकाळात श्वानांच्या हौसे-मोजेसाठी नव्या संकल्पना आखून मुंबई-पुण्यातील बाजारपेठ प्राणीपालकांना आकर्षित करत आहे. निव्वळ श्वानांना पोहण्यासाठी तरणतलावांत जागा आरक्षित होऊ लागल्या आहेत. प्राणी आणि त्यांच्या पालकांसाठी एकत्रित उन्हाळी शिबिरे, सहली, पूल पार्टी आखल्या जात आहेत. श्वानपालन सुखावह करण्यासाठी विविध सेवा पुरवठादार रोज नव्या कल्पना घेऊन सरसावले आहेत.

तरणतलावांवर गर्दी

शहराच्या भोवताली उपनगरांमध्ये फक्त श्वानांसाठी पोहण्याचे तलाव मोठय़ा प्रमाणावर उभे राहिले आहेत. डॉग रिसॉर्टमध्ये श्वानांसाठी पोहण्याचा तलाव असणे ही सुविधा आता गृहीत धरण्यात आली आहे. फक्त श्वानांसाठी किंवा श्वान आणि त्यांच्या पालकांना एकत्रित पोहण्याची, पाण्यात खेळण्याची सुविधा या तलावांमध्ये मिळते. मुंबई-ठाणे, पुणे आणि परिसराचा विचार करायचा झाल्यास साधारण १० ते १५ तलाव आहेत. त्याचप्रमाणे येत्या महिन्यात नव्याने काही सुरू होत आहेत. पोहण्याचे कौशल्य निसर्गत:च श्वानांच्या अंगी असते. अनेक श्वानांना पोहणे आवडते. श्वानांसाठी वेगवेगळ्या जलक्रीडा आखण्यात येतात. पालक आणि श्वानांना एकत्रितपणे पोहता येईल किंवा पाण्यात खेळता येईल असे तलावही अनेक आहेत. पाण्यात मनसोक्त खेळून झाल्यानंतर श्वानाला व्यवस्थित कोरडे करून, केस विंचरून पालकांच्या ताब्यात दिले जाते. शहराच्या मुख्य भागापासून हे तलाव दूर असले, तरी अधिकचे शुल्क आकारून जाण्या-येण्याची सुविधाही प्राणीपालकांना दिली जाते. लहान पिलांसाठी किंवा पहिल्यांदाच पाण्यात जाणाऱ्या श्वानांना पोहण्याची गोडी लागावी यासाठी प्रशिक्षक मदत करतात. तीन तासांसाठी साधारण पाचशे रुपयांपासून शुल्क आकारले जाते. प्राण्यांबरोबर नौकाविहार करण्यासाठीही काही तलाव उभे राहात आहेत.

उन्हाळी शिबिरे

सुट्टीत दूरच्या सहलीला जाताना प्रत्येक वेळी घरातील श्वानाला बरोबर नेता येत नाही. अशांसाठी ही उन्हाळी शिबिरे दिलासादायक ठरत आहेत. समुद्रकिनारे, रिसॉर्ट, अ‍ॅग्रो फार्म अशा ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात येतात. सध्या पुणे आणि मुंबईमध्ये सहा ते सात व्यावसायिक अशी शिबिरे आयोजित करतात. साधारण २ हजार रुपयांपासून या शिबिरांसाठीच्या शुल्काची सुरुवात होते. वेगवेगळे खेळ, स्पर्धा या शिबिरांमध्ये आयोजित करण्यात येतात. प्राणी आणि त्याच्या पालकांना घरापासून दूर, रोजच्या दिनक्रमापेक्षा वेगळ्या वातावरणात एकत्रितपणे वेळ घालवता यावा, ही मूलभूत संकल्पना घेऊन या शिबिरांची सुरुवात झाली. श्वानपालकांसाठी मार्गदर्शन करणारे वर्गही या शिबिरात असतात. प्राणी पालकत्वाच्या या मेळाव्याला गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद वाढत आहे. याबाबत ‘क्रेझी के ९ कॅम्पर्स’च्या पूजा साठे-गावंडे यांनी सांगितले, ‘एप्रिल आणि मे मध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. श्वानांनाही त्यांच्या रोजच्या वातावरणापासून दूर विरंगुळा मिळणे गरजेचे असते. अगदी छोटय़ा सहलीला जायचे झाले तरी श्वानाला दूर ठेवून जाणे अनेकांना आवडत नाही. त्यांच्यासाठी या शिबिरांची सुरुवात केली. या निमित्ताने वेगवेगळी प्राणिप्रेमी कुटुंबे एकत्र येतात. त्यांच्यातही प्राणीपालनातील अनुभवांची देवाण-घेवाण होते, त्याचबरोबर विरंगुळाही मिळतो.’

पूल पार्टी

पंधरवडय़ापूर्वी सगळीकडे होळी उत्साहाने साजरी होत असताना घरातील श्वानही त्यापासून वेगळे राहिले नाहीत. श्वानांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘रंगविरहित होळी पार्टी’पुण्यात नुकतीच रंगली. त्याचबरोबर संपूर्ण वैशाख वणव्याच्या तीन महिन्यांत अनेक क्लब्स आणि रिसॉर्टसाठी ‘श्वान आणि पालकांसाठी एकत्र ‘पूल पार्टी’, ‘रेन डान्स’चे आयोजन केले आहे. पेपी पॉज या रिसॉर्टचे राशी पौडवाल यांनी सांगितले, ‘एखादा अपवाद वगळला तर कोणत्याही प्रजातीचे श्वान असले तरीही त्याला पोहायला किंवा पाण्यात खेळायला आवडते. त्यात उन्हाळ्यात पाण्यात खेळून त्यांनाही बरे वाटते. श्वान लहान असेल, तर ते पाण्याला घाबरू शकते. त्यामुळे त्याला पाण्याची ओळख करून देताना काही काळजी घ्यावी लागते. मात्र एकदा पाणी आवडले तर पुन्हा श्वानाला लवकर घरी जायचे नसते इतके ते पाण्यात खेळण्यात रमतात.’

Story img Loader