ठाणे : डॉलिटल इव्हेंट्स यांच्यावतीने महिला दिनानिमित्त रीवाझ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रविवार, ९ मार्च रोजी सायंकाळी ५ ते १० यावेळेत लोकपुरम कॉम्प्लेक्स, ठाणे(प) येथे असणार आहे. महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीत मर्यादित राहण्याऐवजी शिक्षण, विज्ञान, क्रीडा, व्यवसाय, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत. पूर्वी महिलांना अनेक बंधनं होती, पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. प्रत्येक स्त्रीला समान हक्क, संधी आणि आदर मिळायला हवा. यासाठी डॉलिटल इव्हेंट्स यांच्यावतीने रीवाझ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये विविध हस्तकला, गृहउद्योग आणि खाद्यपदार्थ बनवणाऱ्या महिला उद्योजकांना आपली उत्पादने सादर करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये साबण, पॅशन आर्ट पर्स, दागिने, लोणची, साड्या, खाद्यपदार्थ अशा विविध वस्तूंची दुकाने असणार आहेत. या उपक्रमात ४६ ते ४७ महिला सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या महिला सौम्य रंगांचे कपडे परिधान करून महिला दिन साजरा करणार आहेत.

ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध आकर्षक स्थानिक उत्पादने खरेदी करता येणार आहे. तसेच उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांना त्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी आणि भविष्यातील ग्राहक मिळवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. घरगुती उद्योग करणाऱ्या महिलांसाठी बाजारपेठ निर्माण करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रदर्शनामुळे महिलांना नव्या व्यावसायिक संधी मिळतील आणि ग्राहकांशी थेट संपर्क साधता येईल. महिला उद्योजकांना एकत्र आणणाऱ्या आणि त्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनामुळे स्थानिक महिला उद्योगांना चालना मिळण्याची शक्यता आहे.