डोंबिवली पूर्व येथील घरडा सर्कल चौकातील वाहतूक बेटाचा आकार मोठा असल्याने चौकातून वाहनांची ये-जा होताना वाहतुकीला अडथळा येत आहे. त्यामुळे या वाहतूक बेटाचा आकार कमी करावा, असा प्रस्ताव कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांनी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेला दोन ते तीन वेळा पत्र देऊनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याने वाहतूक विभागाचे अधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर भागातून डोंबिवलीत येणाऱ्या वाहनांचे घरडा सर्कल हे मुख्य प्रवेशद्वार आहे. घरडा सर्कल चौकात काही वर्षापूर्वी घरडा कंपनीच्या सहकार्याने दहा फूट व्यासाचे गोलाकार वाहतूक बेट बांधण्यात आले आहे. या चौकात वाहतुकीचे योग्य नियोजन व्हावे. वाहनांना सुलभपणे ये-जा करता यावी हा यामागील मुख्य हेतू होता. बाहेरून डोंबिवलीत येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक बेटाचा मोठा आकार वाहनांना आता अडसर ठरू लागला आहे.

काही महिन्यापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिकेने घरडा सर्कल चौकात स्मार्ट सिटी योजनेतून सिग्नल यंत्रणा बसवली आहे. येथे पूर्वी सिग्नल नसल्याने वाहनांची सतत ये-जा सुरू असायची. आता सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने घरडा चौकामध्ये वाहनांना दोन ते तीन मिनिट किंवा त्याहून आधिक वेळ थांबावे लागते. त्यामुळे रिजन्सी अनंतम गृहसंकुलाकडून डोंबिवलीत येणाऱ्या वाहनांची रांग अनेक वेळा पेंढरकर महाविद्यालयाच्याही पुढे जाते. तर कल्याणहून ९० फुटी रस्त्याने घरडा सर्कलकडे येणाऱ्या वाहनांची रांग बंदिश हॉटेलपर्यंत जाते. डोंबिवलीतून टिळक पुतळ्याकडून येणाऱ्या वाहनांची रांग अनेक वेळा शिवम रूग्णालयाच्या पुढे जाते. चौकात अलीकडे रांगा लागत असल्याने डोंबिवली जिमखान्याकडून आजदे गावातून बाहेर पडणारी वाहने जागीच अडकून पडतात. घरडा सर्कल चौकात वाहतूक पोलीस, सिग्नल यंत्रणा असूनही वाहतूक बेटाच्या मोठ्या आकारामुळे वाहनांना वळण घेताना कसरत करावी लागते. मोठ्या प्रवासी बस या चौकातून वळण घेत असतील तर इतर लहान मोठी वाहने बसमागे अडकून पडतात.

घरडा सर्कल चौक तीन दिशा मार्गिकेचा आहे. या ठिकाणाहून वाहनांना ये-जा करताना वळण घेऊन जावे लागते. चौकाच्या बाजूला असलेल्या रणगाड्याजवळ पुणे, कोल्हापूर, कोकणात जाणाऱ्या प्रवासी वाहतूक बस उभ्या असतात. या बसमुळे चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो आणि वाहतूक कोंडी होते.

ही कोंडी सोडविण्यासाठी कल्याण-डोंबिवली पालिकेने घरडा सर्कल चौकातील वाहतूक बेटाचा आकार कमी करावा अशी मागणी करणारा प्रस्ताव कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांनी कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाला दिला आहे. अशा प्रकारची तीन पत्रे वाहतूक विभागाने पालिकेला देऊनही त्याची दखल घेण्यात येत नसल्याची खंत वाहतूक विभागाने व्यक्त केली आहे. यासंदर्भात आपण स्वतः पालिकेच्या आयुक्तांना जाऊन भेटणार आहोत असे क्षीरसागर यांनी सांगितले.

परंतु पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले, घरडा सर्कल चौकातील वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव पालिकेकडे आलेला नाही. याउलट या चौकात नियमित पडणारे खड्डे विचारात घेऊन या चौकाच्या चारही बाजूने मास्टेक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ता तयार करण्याचा विचार सुरू आहे. या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. याठिकाणी कारंजे अथवा लहान मुलांचे मनोरंजन होईल अशा सुविधा बसविण्यात येणार आहेत.