डोंबिवली : पावसाने उघडिप देऊन आठवडा झाला तरी डोंबिवली पश्चिमेतील विविध रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे ठेकेदाराकडून केली जात नाहीत. या घटनेचा निषेध म्हणून डोंबिवलीतील रिक्षा चालक-मालक संघटनेने गुरुवारी डोंबिवली पश्चिमेतील पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मागील दोन महिन्यांपासून रिक्षा चालक हैराण आहेत. खड्ड्यात रिक्षा आदळते. त्यामुळे चालकांना दर आठवड्याला रिक्षा दुरुस्ती, देखभालीसाठी दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो. अनेक रिक्षा चालकांना पाठदुखी, कंबर दुखीचा त्रास सुरू झाला आहे. दिवसभर प्रवासी वाहतुकीमधून मिळणारे उत्पन्न चालकांना रिक्षा दुरुस्ती, डाॅक्टरांच्या देयकासाठी खर्च करावे लागते, असे रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अंकुश म्हात्रे यांनी सांगितले. संघटनेचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा : कल्याणमधील अल्पवयीन तरुणीवरील हल्ल्यानंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाविरुध्द दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
नागरिक व वाहन चालक खड्ड्यांतून ठेचकळत प्रवास करत आहेत. आता पावसाने उघडिप दिली आहे. खड्डे बुजविण्याची कामे तात्काळ होणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसात हवामान विभागाने पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस सुरू झाला तर खड्डे बुजविण्याची कामे पुन्हा रखडतील, अशी शक्यता रिक्षा संघटनेचे शेखर जोशी यांनी वर्तवली. पावसाने थांबून आठवडा उलटला तरी माती व खड्डयांनी भरलेल्या रस्त्यांवरुन प्रवाशांना प्रवास करावा लागतो. रस्त्यावरील धुळीने अनेक व्याधी प्रवाशांना जडत आहेत. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न जोशी यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : कल्याणमध्ये तरुणाच्या हल्ल्यात अल्पवयीन मुलीचा मृत्यू
‘रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे ठेकेदाराकडून सुरूच आहेत. डोंबिवली पश्चिमेत ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत ते बुजविण्यासाठी दोन्ही ठेकेदारांना तात्काळ आदेशित करतो. पश्चिमेतील एकाही रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असे नियोजन केले आहे’, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. अभियंता अजय महाजन यांनीही रिक्षा चालकांचे म्हणणे ऐकून खड्डे भरणीची कामे तात्काळ सुरू करत आहोत, असे आश्वासन दिले.