बाजीप्रभू चौकातील वाहनतळ पालिकेकडे
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील चिमणीगल्लीत पाटकर प्लाझामध्ये उभारण्यात आलेला भुयारी व पहिल्या माळ्याचा वाहनतळ लवकरच कडोंमपाच्या ताब्यात येणार आहे. मानपाडा रस्त्यावरील टाटा मनोऱ्याखालील जागाही ताब्यात घेऊन तेथे खासगीकरणाच्या तत्त्वावर वाहनतळ सुरू करण्याचा महापालिकेचा विचार आहे.
या दोन्ही वाहनतळ परिसराची रविवारी महापालिका पदाधिकारी, वास्तुविशारद, शहरातील जाणकार नागरिक यांनी एकत्र पाहणी केली. डोंबिवली पूर्व भागात पी. पी. चेंबर्स मॉल ही एकमेव वाहने उभी करण्याची जागा आहे. अन्य वाहने मानपाडा रस्ता, नेहरू रस्ता, फडके रस्ता, रामनगरमधील रस्त्यांवरील अंतर्गत गल्ल्यांमध्ये सम विषम तारखेप्रमाणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना त्रास, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. राजाजी रस्त्याला रेल्वेचे वाहनतळ होते, पण ते वाढीव दर ठेकेदाराकडून मिळत नसल्याने बंद करण्यात आले आहे. डोंबिवली पूर्व भागात बाजीप्रभू चौकात पाटकर इमारत वापरासाठी तयार झाली आहे. या इमारतीत महापालिकेला भुयारी व पहिल्या माळ्यावर सर्वसमावेशक आरक्षणाखाली वाहनतळाची जागा उपलब्ध झाली आहे. ही जागा महिनाभरात पालिकेला विकासकाकडून ताब्यात मिळणार आहे.
टाटा लाइनखाली वाहनतळ
टिळक रस्ता ते शिवमंदिर रस्ता दरम्यान टाटा वीज वाहिनीचे मनोरे आहेत. सुमारे ३०० मीटरच्या या रस्त्यादरम्यान गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून नियमबाह्य़ वाहने उभी केली जातात. सद्यपरिस्थितीत सुमारे ६०० दुचाकी, १०० चारचाकी वाहने या भागात उभी असतात. वाहतूक कोंडीत भर पडल्यामुळे महापालिकेने टाटा मनोऱ्याखाली तळ व पहिल्या माळ्याचे बांधकाम करून या ठिकाणी वाहनतळ सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खासगीकरणातून हे वाहनतळ चालविण्याचा पालिका विचार करीत आहे, असे वास्तुशिल्पकार राजीव तायशेटय़े यांनी सांगितले.