Dombivili Crime News: डोंबिवली पूर्व येथील चोळेगाव परिसरात एका इमारतीत घडलेला भीषण प्रकार सध्या समोर आला आहे. तक्रारदार सदानंद सालियन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या इमारतीतील कुटुंबाने त्यांच्यासह पत्नीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. आरोपी कुटुंबाने सदानंद यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समजतेय. तक्रारपत्रात समोर आलेल्या माहितीनुसार, सदानंद सालियन हे मागील १० वर्षांपासून या इमारतीत राहतात. अलीकडेच त्यांनी इमारतीचे सचिव पद स्वीकारले होते. मागील चार महिन्यांपासून इमारतातीत पाण्याची अडचण जाणवत होती यावरून ६ जानेवारीला इमारतीच्या टेरेसवर एक मीटिंग चालू होती. मीटिंगमध्ये सदानंद सालियन व उजाला अंकुश पाटील अशा दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता त्यानंतर सालियन यांच्यावर उजाला त्यांची पत्नी अमृता व भाऊ रोहित पाटील यांनी हल्ला करत मारहाण केली.
यावेळी सालियन यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावरील कपडे फाडून अश्लील भाषेत शिवीगाळ केला गेला. तसेच सालियन दाम्पत्याला बिल्डिंगच्या जिन्यात ढकलून देत त्यांच्यावर विटा व लाकडी फ्रेम सुद्धा फेकण्यात आली होती. या हाणामारीदरम्यान सालियन यांच्या पत्नीस गंभीर दुखापत झाली असल्याची तक्रार सदानंद यांनी पोलिसांकडे केली आहे.
सदर प्रकरण ६ जानेवारी २०२४ रोजी घडल्याचे समजतेय. सालियन यांनी यासंदर्भात X खात्यावर व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री शिंदेंसह पोलिसांना सुद्धा टॅग केले आहे. तक्रारपत्रात असणारा उल्लेख व सालियन यांच्या खात्यावर दिसणाऱ्या व्हिडीओनुसार, सालियन आपल्या पत्नीच्या उपचारासाठी त्यांना घेऊन दवाखान्यात गेले असता आरोपी पाटील कुटुंबाने सालियन यांच्या गाडीची सुद्धा तोडफोड केली.
कशामुळे झाला वाद?
तक्रारपत्रानुसार, सदानंद सालियन हे राहत असलेल्या इमारतीत रोहित व उजाला यांच्या वडिलांच्या नावे एक फ्लॅट आहे जो सध्या भाड्याने देण्यात आला आहे. रोहित व उजाला दोघेही जवळच्याच एका बंगल्यात राहतात. घटनेच्या दिवशी ते दोघेही उपस्थित होते तसेच उजाला यांची पत्नी अमृता या सुद्धा मीटिंगमध्ये आल्या होत्या. चर्चा सुरु असताना अमृता यांनी मोठ्या आवाजात हस्तक्षेप केल्याने सदानंद यांनी त्यांना रोखले व तुम्ही सदस्य नसल्याने उगाच गोंधळ घालू नका असे सांगितले होते. यावरून उजाला यांना राग आल्याने त्यांनी सदानंद यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. काहीच क्षणात हा वाद मारामारीत बदलला. यावेळी सालियन यांची पत्नी मीटिंगसाठी आलेली नव्हती त्यांना हा वाद थांबवण्यासाठी शेजाऱ्यांनी कॉल करून बोलावले होते. त्यांनी मध्यस्थी करताना रोहित पाटील याने सालियन यांच्या पत्नीचे कपडे फाडून अर्वाच्य भाषेत त्यांचा विनयभंग केला.
कुटुंबाने मांडली व्यथा
सदानंद सालियन यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, “जेव्हा पत्नीस उपचारासाठी डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले होते त्यावेळेस उजाला व रोहित हे रुग्णालयाच्या आवारात सुद्धा आले होते, अश्लील हातवारे व भाषेत त्यांनी सदानंद यांच्या पत्नीला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला. यावेळी हॉस्पिटलच्या सुरक्षरक्षकांनी त्यांना रोखले असता त्यांनी उलट आम्हीच त्यांना शिवीगाळ केल्याचं खोटं सांगायला सुरुवात केली. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आवश्यक गोष्टी नसल्याने आम्हाला कळव्याच्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले पण आमचे बाळ लहान असल्याने तसं करणं शक्य नव्हतं. शेवटी जेव्हा आम्ही घरी परतलो तेव्हा आरोपी कुटुंबातील महिलांनी इमारतीच्या आवारात आम्हाला पुन्हा शिवीगाळ केला. आमचे बाळ घरात एकटे असताना आमच्या राहत्या घरावर दगड फेकून खिडकीच्या काचा सुद्धा फोडण्यात आल्या यामध्ये आमच्या कुटुंबियांना दुखापत झाली. आमच्या घराखाली दोन दिवसांपासून पाटील कुटुंबाबातील काही जण व काही गुंड सुद्धा बांबू घेऊन फिरत आहेत. आम्हाला घरातून बाहेर पडणे सुद्धा शक्य होत नाहीये. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असली तरी याप्रकरणी अद्याप कारवाई झालेली नाही. आम्हाला वारंवार ११२ क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले जात आहे, मात्र ठोस उत्तर मिळालेलं नाही.”
हे ही वाचा<< भारतीय सीईओने ४ वर्षाच्या लेकाची केली हत्या; मृतदेह बॅगेत भरून पळताना अटक; चौकशीत म्हणाली, “पती बरोबर..”
पोलिसांनी काय सांगितलं?
दुसरीकडे, याप्रकरणी रामनगर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ नितीन गीते यांनी लोकसत्ता ऑनलाईनला सांगितले की, “घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला आहे. सध्या त्या परिसरात गुंड उपस्थित नाहीत. रोहित पाटील, उजाला पाटील व अमृता पाटील यांच्यावर कलम ३५४ व ३२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोघेही फरार आहेत व पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. ते दोघे सापडल्यावर फरार म्हणून त्यांना अटक केली जाऊ शकते.”