डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आज दुपारी २ च्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत सात कामगारांचा मृत्यू झाला तर ४८ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या स्फोटामुळे या भागात राहणाऱ्या अनेकांच्या घरातील काचा फुटल्या, तर काहींच्या घराचे नुकसान झाले. तसेच या स्फोट झाला तिथून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलचे छत कोसळलं. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी हॉटेलमध्ये २५ ते ३० जण जेवण करत होते, अशी माहिती या हॉटेलच्या मालकाने दिली.
डोंबिवलीतील स्फोटामुळे ज्या हॉटेलचे छत कोसळले, त्या हॉटेलच्या मालकाने एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी बोलताना स्फोट झाला त्यावेळी नेमकं काय घडलं, याबाबत त्यांनी माहिती दिली. यासंदर्भात बोलताना हॉटेलचे मॅनेजर म्हणाले, हा स्फोट झाला त्यावेळी सर्व टेबलवर लोक जेवण करत होते. मी आत गेलो तेवढ्यात मोठ्याने आवाज झाला. अचानक छत कोसळायला लागलं. त्यांच्या ताटात पूर्ण सीमेंट पडलं होतं. छत कोसळ्याने काही जण जखमीदेखील झाले. या घटनेत आमच्या हॉटेलमधील एक महिला कर्मचारीदेखील जखमी झाली. तिला आम्ही रुग्णालयात दाखल केलं.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की सुरुवातीला आम्हाला वाटलं की भूकंप झाला. म्हणून आम्ही बाहेर आलो, लोक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळत होती. आम्ही हॉटेलच्या मागच्या बाजुला बघितलं तर मोठ्या प्रमाणात आगीचा धूर दिसत होता.
याशिवाय हॉटेलच्या मालकानेही यासंदर्भात माहिती दिली. स्फोट झाला तेव्हा अचानक काय झालं आम्हाला कळलंच नाही. सुरुवातीला आम्हाला भूकंप झाला असं वाटलं. त्यावेळी आमच्या हॉटेलमध्ये २५ ते ३० जेवण करत होते. सर्वप्रथम आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना आम्ही हॉटेलमधून बाहेर काढलं, असं हॉटेलच्या मालकाने सांगितले. या स्फोटामुळे आमचं मोठं नुकसान झालं आहे. तीन वर्षांपूर्वीच आम्ही हॉटेलचे काम केले होते, असेही ते म्हणाले.
हेही वाचा- डोंबिवलीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
दुपारी २ च्या सुमारास घडली घटना :
डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोन मध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी २ ते २.३० च्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या तसंच काही गाड्यांचंही नुकसान झालं. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदेंची घटनास्थळी भेट
दरम्यान, काहीवेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली एमआयडीसीतील जळीत अमुदान कंपनीला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. मानवी जीविताला हानीकारक ठरणाऱ्या डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच या अतिधोकादायक कंपन्यांना पर्याय म्हणून त्यांनी आपल्या कंपनी उत्पादन प्रक्रियेत अभियांत्रिकी, कापड किंवा अन्य बदल करून ते आहे त्या जागेत चालू ठेवावेत. असे बदल ज्यांना करायचे नसतील त्यांनी शहराबाहेर शासनाने भूसंपादित केलेल्या जागेत स्थलांतरित व्हावे, असंही त्यांनी सांगितले.