डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा खाडी किनारी भागात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांकडून बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष नसल्याने खाडी किनाराची खारफुटी वाळू माफियांकडून जेसीबी,पोकलेनच्या साह्याने तोडून टाकली जात आहे.
डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा, गणेश नगर भागातून उल्हास खाडीचा प्रवाह गेला आहे. या खाडीकिनारी भागात खारफुटीचे जंगल, विविध प्रकारचे पक्षी, जैवप्रजाती पाहण्यास मिळत असल्याने डोंबिवली परिसरातील पर्यावरण प्रेमी, छायाचित्रकार, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी सकाळ संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून कुंभारखाणपाडा खडी किनारी भागात दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू आहे. या उपशासाठी सक्शन पंप यांचा वापर केला जात आहे. या यंत्रांच्या आवाजामुळे व खडखडाट यामुळे खाडी परिसरातील रहिवासी, पर्यावरण प्रेमी यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत आहे.
खाडीमध्ये वाळू उपसा चालू असताना खाडी किनारी भागात वाळू माफिया खुर्च्या टाकून बसलेले असतात. या माफियांची या भागात दहशत असल्याने पर्यावरण प्रेमी त्यांना बेकायदा वाळू उपसा का करता म्हणून जाब विचारू शकत नाही. स्थानिक महसूल अधिकारीही या वाळू माफियांच्या दहशतीला घाबरून असतात.
दिवस रात्र खाडीतून केलेला वाळू उपसा बोटीमधून खाडीकिनारी खोदलेल्या हौदामध्ये आणून टाकला जातो. लपवलेली वाळू पोलीस किंवा महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून खारफुटी जंगलाच्या आडोशाला, दोन-तीन इमारतींच्या मागील बाजूस ढीग लावून लपवून ठेवली जाते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
खाडीकिनारीचा वाळू साठा रात्री ११ ते पहाटे पाच वाजेपर्यंत डोंबिवली, कल्याण, भिवंडी परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी नेऊन टाकला जातो. डोंबिवली कल्याण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात अधिकृत, अनधिकृत बांधकामे सुरू आहेत., त्यामुळे वाळूला मोठी मागणी आहे.
चांगल्या वाळूचा एक डंपर तीस ते पस्तीस हजार रुपयांना, त्यापेक्षा कमी दर्जाच्या वाळूचा डंपर १८ ते २५ हजार रुपयांना विकला जातो. हा सगळा बेकायदा व्यवहार असल्याने या खरेदी-विक्री व्यवहारातून महसूल विभागाला स्वामित्वधन मिळत नाही. बेकायदा वाळू उपशातून महसूल विभागाचे कोट्यवधी रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे, असे या क्षेत्रातील एका जाणकाराने सांगितले.
मागील चार ते पाच वर्षांत डोंबिवली खाडीकिनारच्या मोठागाव रेतीबंदर, कोपर, गणेश नगर कुंभारखाणपाडा, देवीचापाडा भागात बेकायदा वाळू उपसा केल्याबद्दल कल्याणच्या तहसीलदारांनी २५ हून अधिक वाळू माफियांच्या विरुद्ध विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा कसून तपास होत नसल्याने आणि गुन्हेगारांना शिक्षा होत नसल्याने वाळू माफियाना बळ मिळत आहे, अशी माहिती एका पर्यावरणप्रेमीने दिली.