एखाद्या विषयाची मनापासून आवड असणारी व्यक्ती त्यासंदर्भातला अस्सल दस्तऐवज गवसला तर कितीही पैसे मोजायला मागे पुढे पाहत नाही. डोंबिवलीतील पर्यावरणप्रेमी विजय कुलकर्णी त्यापैकीच एक आहेत. निसर्ग शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणविषयक पुस्तकांचे ग्रंथालय अभ्यासूंना उपलब्ध करून देणाऱ्या या अवलियाने जगभरातून निसर्ग आणि पर्यावरणविषयक ग्रंथ मिळविले आहेत. त्यात अनेक दुर्मीळ आणि अमूल्य अशा पुस्तकांचा समावेश आहे.
ब्रिटिश म्युझियमने प्रकाशित केलेले प्राणीशास्त्रज्ञ रिचर्ड बोव्ड्लर शार्प यांचे ‘बर्डस् ऑफ पॅरेडाइज’ हा त्यातला एक महत्त्वाचा ग्रंथ. तो त्यांनी लंडनहून खरेदी केला. शार्प यांनी १८९१ ते १८९८ या काळात या पुस्तकाच्या फक्त २५० प्रती काढल्या होत्या. तर कालांतराने फोलिओ सोसायटीने या पुस्तकाच्या आणखी एक हजार प्रती काढून जगामध्ये वितरित केल्या. त्यातली एक प्रत विजय कुलकर्णी यांनी तब्बल ५० हजार रुपयांना खरेदी केली. सोन्याचा मुलामा असलेले मुखपृष्ठ, नक्षीकाम, हाताने काढलेली पक्ष्यांची चित्रे असलेल्या या पुस्तकात आशिया खंडात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यांच्या राहणीमानाविषयीची निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. आजघडीला या पुस्तकाची बाजारातील किंमत तब्बल ८० हजार रुपये आहे, मात्र कुलकर्णी यांच्या निसर्ग शिक्षण संस्थेत ते पुस्तक सहज पाहायला, वाचायला मिळते.
या ग्रंथसंग्रहात ‘रॉयल बोटॅनिकल क्यू गार्डन’ यांनी प्रकाशित केलेले ‘ऑन दी फॉरेस्ट ऑफ ट्रॉपिकल आशिया’ हे दुर्मीळ पुस्तकही आहे. आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय वनांचे वर्णन, भौतिक भूगोल, वन आणि वृक्ष रचना, प्रेरक शक्ती, वनांचा इतिहास, मानवी प्रभाव सोडवण्यासाठी आणि वने जतन करण्यासाठी धोरणात करावे लागणारे बदल याविषयी संपूर्ण माहिती या पुस्तकात उपलब्ध आहे. याशिवाय ‘किंगफिशर अँड रिलेटेड अदर बर्ड’ हे किंगफिशर पक्ष्याविषयी इत्थंभूत माहिती देणारे पुस्तक कुलकर्णी यांच्या एका मित्राने त्यांना ऑस्ट्रेलियाहून पाठवले आहे. ‘सी स्नेक ऑफ इंडिया’ हे ११० वर्षांपूर्वीचे पुस्तक, महाराष्ट्राची निसर्गलेणी, १९५७ सालचे ‘बटरफ्लाय ऑफ द इंडियन रिजन’ अशी अनेक महत्त्वपूर्ण व दुर्मीळ ग्रंथसंपदा कुलकर्णी यांच्या संग्रहात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा