डोंबिवली : ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या सरावासाठी देशात तेवढ्या क्षमतेची क्रीडासंकुले नाहीत. त्यामुळे आपणास दोन पदकांवर समाधान मानावे लागते. याऊलट आफ्रिका, युरोपातील स्पर्धक ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये डझनावारी पदके घेऊन जातात. देशी खेळाडूंची क्रीडाविषयक कौशल्ये विकसित होण्यासाठी, त्यांना सरावासाठी दर्जेदार क्रीडासंकुले विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांनी शनिवारी येथे केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाने डॉ. यु. प्रभाकर राव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विकसित केलेली क्रीडा अकादमी खेळाडूंची ही गरज पूर्ण करील, असा विश्वास न्या. गोखले यांनी व्यक्त केला. पेंढरकर महाविद्यालयाने विकसित केलेल्या डोंबिवली एमआयडीसीतील अद्ययावत क्रीडासंकुलाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. यावेळी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘एमकेसीएल’चे मुख्य प्रवर्तक विवेक सावंत, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई, सचिव डॉ. प्रशांथ राव, ज्येष्ठ पत्रकार विनोद शिरसाठ उपस्थित होते.

हेही वाचा…कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा

आताची मुले समाज माध्यमे, क्रमिक अभ्यासक्रमात गुंग आहेत. त्यांना या व्यवस्थेतून बाहेर काढून मैदानी खेळांसाठी त्यांची मानसिकता तयार करण्यासाठी क्रीडासंकुलांची खूप गरज आहे. पेंढरकर महाविद्यालयाने ही गरज पूर्ण केली आहे. अशा क्रीडाविषयक सुविधांचा लाभ घेऊन स्वतः विकसित होऊन दुर्गम भागातील मुलांसाठी आपणास काय करता येईल का याचाही विचार नवोदितांकडून होणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील मुले सुविधा नसताना ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये बाजी मारतात. दुर्गम भागात अशा सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे, असे न्या. गोखले यांनी सांगितले. इंग्रजीचे वाढते लोण पाहता मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी पुढाकार घेणे खूप आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

अभ्यासक्रमाव्यतिरिक्त खेळणे हा जगण्याचा भाग आहे. अशा काळात पेंढरकर महाविद्यालयाने अद्ययावत क्रीडासंकुल विकसित करून विद्यार्थ्यांना आपल्यातील क्रीडागुण, कौशल्य विकसित करण्याची चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. या क्रीडासंकुलाचा योग्य वापर करून अनेक दर्जेदार खेळाडू या अकादमीत तयार होतील. ते ऑलिम्पिक दर्जाच्या कसोटीला उतरतील, असा विश्वास संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा…भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

यामध्ये आपण कमी पडलो तर मात्र तो पालकांचा दोष असेल, असे ते म्हणाले. या अकादमीतून तयार झालेले विद्यार्थी शक्तिमान, नितीमान भारतासाठी नक्कीच योगदान देतील, असे सावंत यांनी सांगितले. अध्यक्ष देसाई यांनी या क्रीडासंकुलाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू तयार होतील. ते महाविद्यालया बरोबर शहर, देशाचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास प्रास्ताविक भाषणात व्यक्त केला. या कार्यक्रमाला व्यवस्थापक सदस्य उमेश पटवारी, डॉ. आनंद आचार्य, डॉ. प्रदीप राव, डॉ. सुचित्रा कामथ उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali pendharkar college sports complex inaugurated retired justice hemant gokhale calls for more sports infrastructure for india s olympic success psg