सराफांच्या संपामुळे पाडव्याला सोने विकत घेण्याची संधी यंदा नाही
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या दिवशी एक ग्रॅम का होईना, सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या सणाला ज्वेलर्सच्या दुकानांत ग्राहकांची झुंबड उडते. मात्र, सोने खरेदीचा हा शुभ मुहूर्त यंदा साफ हुकणार आहे. केंद्र सरकारने लावलेल्या अबकारी कराविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून सराफ व्यापाऱ्यांचा देशव्यापी संप पाडव्यालाही सुरूच राहणार असल्याने सोने-चांदीची सर्व दुकाने शुक्रवारीही बंद राहणार आहेत.
हिंदू नववर्षांची सुरुवात गुढीपाडवा या सणाने होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त पाडव्याचा असल्याने या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन, घर याबरोबरच सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. एक वळे किंवा एक ग्रॅमचा शिक्का का होईना अगदी गरिबातला गरीब माणूस या दिवशी खरेदी करतो. या पाडव्याला मात्र ग्राहकांना सोने खरेदी करता येईल की नाही याची चिंता लागून राहिली आहे. अबकारी कराच्या विरोधात गेल्या महिन्याभरापासून सराफांचा बंद सुरू आहे. सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे यासाठी वारंवार विविध मंत्र्यांच्या बैठकाही घेण्यात येत आहेत; परंतु त्यातून काहीच फलित निघत नाही.
यासंदर्भात दिल्लीत बैठका सुरू आहेत. मात्र, जोपर्यंत हा कर रद्द होत नाही तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नाही असा निर्णय ऑल इंडिया फेडरेशन असोसिएशनच्या वतीने घेण्यात आला आहे. मध्यंतरी पाडव्याच्या दिवशी ग्राहकांचे नुकसान होऊ नये म्हणून एक दिवस दुकाने सुरू ठेवण्याचा विचार झाला होता. मात्र अद्याप त्यावर निर्णय झाला नसल्याचे डोंबिवली ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र मादरिचा यांनी सांगितले.
’ सोने – २८,५५५ रुपये तोळा
’ महिनाभरात सराफ व्यापाऱ्यांचे नुकसान – पाच हजार दोनशे पन्नास कोटींच्या घरात