डोंबिवलीत एका नामांकित डॉक्टरच्या बंद घरात खिडकीचे ग्रील तोडून घरात घुसून चोरटे घरातील वस्तू दागिने चोरी करुन पसार झाले होते. काही महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. इतकंच नाही तर डोंबिवलीत अनेक घरफोड्या झाल्या होत्या. त्यामध्ये चोरी करण्याची पद्धत एकसारखीच होती. चोरटे घराचे ग्रील तोडून आत शिरायचे. घरातील दागदागिन्यांवर डल्ला मारुन पसार व्हायचे. डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस अधिकारी संपत फडोळ आणि राहुल म्हस्के यांच्या पथकाने या चोरट्याचा शोध सुरु केला होता. आता या चोरट्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांची उत्तर प्रदेशात जाऊन कारवाई
पोलिसांनी जेव्हा सगळी माहिती काढून तपास सुरु केला तेव्हा हे दोन घरफोडी करणारे चोरटे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली. मानपाडा पोलिस ठाण्याची दोन पोलीस पथके उत्तर प्रदेशात पोहचली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या एका घरावर रात्री एक वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्या घरातून राजेश कहार याला अटक करण्यात आली. राजेश याने दिलेल्या माहितीनुसार चिंटूच्या घरी देखील पोलिसांनी तासाभरात छापा टाकला. या दोघांच्या घरांतून लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही चोरट्यांनी गावात आलिशान घरं बांधली आहेत.
२४ गुन्ह्यांची करण्यात आली उकल
राजेश कहार आणि चिंटू या दोघांकडून २३ लाख रुपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्याकडून २४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. तपासात या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दोघांनाही ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवलीत घरफोड्या केल्या आहेत.
खांदेश्वरमध्ये दीड लाखांची घरफोडी
पोलिसांनी काय म्हटलं आहे?
मानपाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याबाबत आम्ही कसून तपास करत होतो. बाहेरच्या राज्यातल्या आरोपींना यांना आम्ही अटक केली आहे. बबलू कहार हा घरफोडीचा सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर १३ गुन्हे दाखल आहे. दुसरा गुन्हेगार चिंटू याच्यावरही घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहे. या आरोपींना पोलिसांनी शिताफीने पकडलं आहे. घरांवर नजर ठेवून रात्रीच्या वेळी घरफोड्या हे दोघं करत असत. घरावर, माणसांवर नजर ठेवून कडी किंवा कोयंडा अत्यंत शिताफीने उघडून या दोघांनी घरफोड्या केल्या आहेत. या दोघांकडून आम्ही ३२५ ग्रॅम सोनं आणि ७ ग्रॅम चांदी असा २२ लाखांहून अधिक किंमतीचा मु्द्देमाल जप्त करण्यात आम्हाला यश आलं आहे. असं डोंबिवलीचे पोलीस अधीक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितलं.