डोंबिवली : डोंबिवली शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून पुन्हा घरफोड्या वाढू लागल्या आहेत. बंद घरांवर पाळत ठेऊन दिवसा-रात्री त्या घरांमध्ये चोरी करुन लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांकडून चोरुन नेला जात आहे. सर्वाधिक वर्दळीचा भाग असलेल्या भागात चोरटे चोरी करत असल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
एमआयडीसीतील बंगले असलेल्या भागात ज्येष्ठ नागरिक, वृध्द राहत असलेल्या घरांना चोरटे सर्वाधिक लक्ष्य करत आहेत. सोमवारी पहाटेच्या दरम्यान डोंबिवली पूर्वेतील राजाजी रस्ता भागातील निवासी ज्येष्ठ नागरिक सुधीर वेंगुर्लेकर (७२) यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातील सोन्याचा ऐवज चोरुन नेला. वेंगुर्लेकर यांनी याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण
अशाच पध्दतीची चोरी चोरट्यांनी पेंडसेनगर भागात राहत असलेल्या संकेत जयंत कुलकर्णी (३४) यांच्या घरात केली आहे. त्यांनीही रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. चोरट्यांनी एकूण चार लाख ७४ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला आहे. एमआयडीसी भागात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या वाढल्याने रहिवाशांमध्ये अस्वस्थता आहे. शहराच्या परिघ क्षेत्रात बेकायदा चाळी बांधण्यात आल्या आहेत. या चाळी चोरट्यांचे आश्रय स्थान असल्याचे सांगण्यात येते.