शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, पाणीउपसा, प्रदूषणामुळे निर्माण होणारे आरोग्याच्या प्रश्नावर डोंबिवली परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उपाय शोधले आहेत. विज्ञान प्रदर्शनात सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती देताना येणारा काळ हा ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या ओळींची आठवण करून दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण डोंबिवली पालिका समूह साधन केंद्र क्र. सात मध्ये आंतरशालेय दोन दिवसांचे विज्ञान प्रदर्शन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय शाखेत आयोजित केले होते. या प्रदर्शनात कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील प्राथमिकच्या सुमारे १०० शाळांनी सहभाग घेतला.

टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती, वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय, टोल नाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी डिजिटल सुविधा, सौर ऊर्जेतून विजेची निर्मिती करून कोळशापासून तयार होणाऱ्या विजेवर कशी मात करता येईल, कचऱ्यापासून खत, वीजनिर्मिती, पाणी व्यवस्थापन अशा समाजोपयोगी पायाभूत प्रकल्पांची मांडणी विद्यार्थ्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून केली. स्वामी विवेकानंद अरुणोदय शाळेच्या विद्यार्थ्यांनी टोल नाक्यावरील होणारी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी वाहनांना दूरसंवेदक बसविला तर टोल नाक्यावर वाहन येताच वाहन आणि नाक्यावरील दूरसंवेदक सक्रिय होऊन काही सेकंदांत वाहन चालकाच्या बँक खात्यामधून टोलवसुली कंपनीच्या खात्यात पैसे जमा होतील. वाहन तात्काळ पुढे निघून जाईल. अशा प्रकारे चार ते पाच रांगांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली तर टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी राहणार नाही, असे सांगितले.

पारंपरिक ऊर्जा स्रोत सौर ऊर्जा, पवनचक्की यांचा प्रभावीपणे वापर केला तर कोळशापासून तयार होणाऱ्या विजेवर अवलंबून राहावे लागणार नाही.

कचऱ्यापासून खत, वीजनिर्मिती करून शहर स्वच्छ व प्रदूषणमुक्त करता येईल. घरातील टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्माण केल्या तर कचऱ्याचे प्रमाण कित्येक पटीने कमी होईल. पालिकेकडून येणारे पाणी आणि कूपनलिका यांच्या पाण्याचा मेळ साधून सोसायटीत पाण्याचा समतोल वापर केला तर घराघरांत होणाऱ्या पाणी उपशावर सोसायटय़ांना निर्बंध आणता आणणे शक्य होईल, असे विद्यार्थ्यांनी सूचविले. या वेळी मुख्याध्यापिका वासंती चौधरी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य आनंद रानडे, शाळा समिती अध्यक्ष सुभाष वाघमारे, अलका वाकडे, विस्तार अधिकारी सरकटे, केंद्रप्रमुख यादव, नगरसेवक नंदू म्हात्रे, परीक्षक मधुरा सावंत, अमिता बांदेकर आदी उपस्थित होते. रोहित माळी, हर्ष खोचरे यांच्या ‘ई ट्राफिक’ प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivali student presented project on health issues in science exhibition