डोंबिवली : तू माझ्या बरोबर बोलली नाहीस, माझ्याशी संपर्क ठेवला नाही तर मी तुझ्यावर ॲसिड हल्ला करून तुला मारीन आणि तुझे के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील शिक्षण कसे पूर्ण होते ते मी पाहतोच, अशी धमकी देत शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी येथील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थीनीचे शनिवारी सकाळी एका २८ वर्षाचे तरूणाने अपहरण केले. नंतर तिला मारण्याची धमकी देत सोडून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या प्रकाराने डोंबिवली, कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही, असे प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहेत. या प्रकाराने अल्पवयीन विद्यार्थीनीचे कुटुंब हादरून गेले आहे. या तरूणाने रागाच्या भरात मुलीचे काही केले असते तर त्याला जबाबदार कोण असते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

हेही वाचा…कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत, कामाच्या पहिल्याच दिवशी लोकलचा गोंधळ असल्याने प्रवासी संतप्त

अल्पवयीन विद्यार्थीनी शिळफाटा रस्त्यावरील खिडकाळी, देसाईनाका भागातील एका गृहसंकुलात कुटुंबीयांसह राहते. ती डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. नितीन रवींद्र गायकवाड (२८, रा. मराठी शाळेच्या मागे, खिडकाळी गाव, पडले, शिळफाटा रस्ता) असे आरोपी तरूणाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, खिडकाळी येथे राहणारी पीडित तरूणी के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात शिक्षण घेते. शनिवारी सकाळी दहा वाजता ती एमआयडीसीतील विको नाका येथे बसने उतरली. तेथून ती पायी पेंढरकर महाविद्यालयाकडे चालली होती. या रस्त्यावरील स्नेह बंगल्यासमोरून जात असताना आरोपी नितीन गायकवाड स्वतः रिक्षा चालवित या तरूणीच्या पाठीमागे आला. त्याच्या रिक्षेत कोणीही नव्हते. त्याने जबरदस्तीने अल्पवयीन विद्यार्थीनीला आपल्या रिक्षेत बसण्यास भाग पाडले. तिने नकार दिला, पण त्याने जबरदस्ती केली. त्यानंतर नितीनने रिक्षा सुसाट वेगाने आर. आर. रुग्णालय येथून कावेरी चौकातून सोनिमा इमारत समोरील एका झाडाखाली उभी केली.

हेही वाचा…डोंबिवली ‘एमआयडीसी’त बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट

त्याने रिक्षा बंद करून तो मागच्या आसनावर बसलेल्या अल्पवयीन विद्यार्थीजवळ आला. तिची मान मुठीत जोराने पकडून तिचे हात पकडून तिला, तू कुठे जातेस, तू कोणाशी बोलतेस, माझ्याशी संपर्क का ठेवत नाहीस, माझ्याशी बोलत जा, भेटत जा, अशी दटावणी केली. यावेळी मला तुझ्याशी बोलायचे नाही असे तरूणीने नितीनला सांगताच तो चवताळला. त्याने पीडित तरूणीला पुन्हा धमकी दिली की फक्त माझ्याशी संपर्क ठेऊन नकोस बघ, मग तू तुझे महाविद्यालयीन शिक्षण कसे पूर्ण करतोच तेच मी बघतो. आणि तू माझ्याशी संपर्क ठेवला नाहीतर तर तुझ्यावर ॲसिड फेकून तुला जायबंदी करतो, अशी धमकी दिली. या प्रकाराने तरूणी घाबरली.

हेही वाचा…धर्मवीर- २ चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले; म्हणाले, “शिंदे स्वत:ला…”

तिला तेथेच सोडून नितीन गायकवाड निघून गेला. पीडितेने घरी गेल्यावर कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. काळदाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli 17 year old college student kidnapped and threatened with acid attack by 28 year old man psg