डोंबिवली : गरोदरपणात चार वेळा मुल मयत झाल्याने आलेल्या नैराश्यातून एका २९ वर्षाच्या महिलेने मंगळवारी आपल्या दावडी भागातील घरात छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंबिवली पूर्वेतील दावडी भागातील समर्थनगर भागात ही महिला आपल्या पतीसह राहत होती.

या महिलेचा पती नोकरी करतो. मयत महिलेचे काही वर्षापूर्वी लग्न झाले होते. मागील तीन ते चार वर्षात या महिलेला गरोदरपणात चार वेळा बाळे झाली. प्रसूतीनंतर ही चारही बाळ मयत झाली. होणारी बाळे मृत होत असल्याने महिलेला चिंतेने घेरले होते. याच विचारत असताना तिला नैराश्य आले होते. पतीने तिला समजविण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनातून विचार जात नव्हते.

बाळ मृत होत असल्याचा विचार सतत मनात येत असल्याने ही महिला नैराश्याच्या गर्तेत गेली. तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येत होते. मंगळवारी सकाळी पती कामावर निघून गेला. त्यानंतर महिलेने राहत्या घरातील स्वयंपाक घरातील छताला असलेल्या हुकला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कोणी नसल्याने आणि दिवसभरात कोणीही या महिलेच्या घरात न आल्याने महिला घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत राहिली. कोणालाही या प्रकाराची चाहूल लागली नाही.

संध्याकाळी साडे सात वाजता या महिलेचा पती घरी आला. त्यावेळी त्याने घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांच्या साहाय्याने घरात पाहिले असता पत्नी गळफास घेतला असल्याचे पतीच्या निदर्शनास आले. ही माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली. या मृ्त्यूप्रकरणी आपली कोणा विरुध्द तक्रार नाही असे पतीने मानपाडा पोलीस ठाण्यातील दाखल नोंदीत म्हटले आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader