आई खूप आजारी आहे. तिच्याशी बोलायचे आहे. जरा मोबाईल देता का, असे बोलून दोन भामट्यांनी ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावर गुरुवारी पहाटे चार वाजता फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका पादचाऱ्या जवळील मोबाईल हातोहात लांबविला. माणुसकीच्या भावनेतून दोन जणांना संभाषणासाठी मोबाईल देऊन त्यांनी तो लबाडीने पळवून नेल्याने संतप्त झालेल्या रहिवाशाने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यातील पोलिसावर लाच मागितल्याचा गुन्हा ; पोलीस उपनिरीक्षकाच्या नावे मागितली होती लाच
ठाकुर्ली ९० फुटी रस्ता परिसरात मध्यवर्गिय वस्ती वाढली आहे. या भागात राहणारे रहिवासी ठाकुर्ली रेल्वे स्थानकात उतरुन पायी घरी जातात. अनेक रहिवासी रात्री भोजनानंतर, पहाटे पासून ९० फुटी रस्ता भागात फिरण्यासाठी येतात. अशा पादचाऱ्यांना एकटे गाठून त्यांना खोटी कारणे देऊन किंवा चलाखीने त्यांच्या जवळील ऐवज, मोबाईल चोरायचे अशी नवीन क्लृप्ती चोरट्यांनी अवलंबली आहे. ९० फुटी रस्ता भागात भुरट्या चोऱ्या, घरफोड्या वाढल्याने रामनगर, टिळकनगर पोलिसांनी या भागातील दिवसा, रात्रीची गस्त वाढविली आहे. गेल्या पाच दिवसा पूर्वी ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकात रामनगर पोलिसांनी सात जणांची दरोडेखोरांची टोळी अटक केली आहे. डोंबिवली पाथर्ली, त्रिमूर्तीनगर, चोळे भागातील ही मुले आहेत.
पोलिसांनी सांगितले, सागरकुमार यादव (२१, रा. शेवपुरी विक्री, गणेश चाळ, मलंगगड रस्ता, कल्याण पूर्व) हे व्यावसायिक आपल्या बंधू सोबत गुरुवारी पहाटे चार वाजता ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर सकाळच्या फिरण्यासाठी आले होते. या रस्त्यावरील मोहन सृष्टी सोसायटी जवळून जात असताना त्यावेळेत स्कुटर वरुन दोन तरुण आले. त्यांनी सागरकुमार यादव यांच्या जवळ दुचाकी थांबवली. त्यांनी भयभीत होऊन दीनवाणीने सागरकुमार यांना ‘माझी आई खूप आजारी आहे. मला तातडीने तिच्याशी बोलायचे आहे. पण आमच्या जवळ मोबाईल नाही म्हणून दोन मिनीट तुमचा मोबाईल देता का,’ अशी विचारणा केली.
हेही वाचा >>> ठाणे शहरातील तापमानाचा पारा वाढला…. ; वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या अगांची काहीली
माणुसकीच्या भावनेतून सागरकुमार यांनी तातडीेने दुचाकी वरील एका मुलाकडे आपला मोबाईल संभाषणासाठी दिला. दुचाकी स्वाराने थोडी गाडी रस्त्याच्या बाजुला घेतो आणि मग आईशी बोलतो असे सागरकुमार यांना बोलून दुचाकी थोडी पुढे नेऊन सागरकुमार यांना काही कळण्याच्या आता सुसाट वेगाने पळून गेले. सागरकुमार आणि त्यांच्या भावाने दुचाकी स्वारांचा पाठलाग केला. पण ते हाती लागले नाहीत.
सागरकुमार यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहन सृष्टी भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलीस या दोन भामट्यांचा शोध घेत आहेत. मागील दोन महिन्यापासून ठाकुर्ली ९० फुटी रस्ता भागातील चोऱ्या वाढल्याने या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.