“मागील ४० वर्षाच्या काळात कल्याण-शिळफाटा रस्ते बाधितांना शासनाने मोबदला दिला नाही. गेल्या चार वर्षाच्या काळात मोबदला देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने वेळकाढुपणा करुन हा विषय लालफितीत अडकविला. त्यामुळे येत्या महिनाभरात शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला नाहीतर कल्याण-शिळफाटा रस्त्यावर काटई भागात बाधित शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले जाईल.”, असा इशारा भिवंडी-कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. याचबरोबर, शीळफाटा मार्गावर लोकसत्ता मध्ये छापून आलेल्या बातम्यांचे मोठे फलकही उभारले असून, लोकसत्ताचे आभार देखील व्यक्त केले आहेत.
कल्याण-शिळफाटा रस्त्याचे सुरू असलेले रुंदीकरण, काँक्रीटीकरणाचे काम शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने रखडले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या असंघटितपणाचा गैरफायदा घेत शिळफाटा रस्त्यासाठी लगतच्या गावांच्या जमिनी शासनाने कोणताही मोबदला न घेतल्या. प्रत्येक वेळी अशाप्रकारे रस्ते रुंदीकरण करुन शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शिळफाटा रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांना शासन भूमीहिन करणार आहे का, असा प्रश्न बाधित शेतकरी संघटनेचे गजानन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.
ठाणे : ‘हास्य जत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परबचा मोबाईल चोरट्यांनी हातातून हिसकावून नेला
सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे, कल्याण डोंबिवली पालिका, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी शिळफाटा रस्ता रुंदीकरणासाठी मनमानी पध्दतीने जमिनी घेतल्या. शेतकऱ्यांना गावाजवळून रस्ता जात आहे म्हणून कधी विरोध केला नाही. परंतु, आता शेतकऱ्यांच्या घराच्या अंगणात, दारात रस्त्याची हद्द आली आहे. येत्या काळात या शेतकऱ्यांना रस्त्यासाठी त्या जागेतून उठविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे यावेळी जमिनीचा मोबदला मिळाल्या शिवाय बाधित शेतकरी शिळफाटा रस्त्यासाठी जमिनी देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
डोंबिवलीत दोन अल्पवयीन मुलांकडून २२ मोबाईल, १० सायकलची चोरी
गणेशोत्सव काळात बेमुदत धरणे आंदोलन केले तर त्याचा गणेश भक्तांना फटका बसू शकतो. त्यामुळे गणेशोत्सवानंतर हे आंदोलन केले जाईल, असे पाटील यांनी सांगितले. गेल्या चार महिन्यापूर्वी शासनाने स्थापन केलेल्या शिळफाटा रस्ता मोबदला समितीने विनाविलंब मोबदल्याचा निर्णय घ्यावा. आम्हाला मोबदला मिळालेला नाही असे सत्यप्रतिज्ञा पत्राव्दारे लिहून देण्यास आम्ही बाधित शेतकरी तयार आहोत. ज्यामुळे शासनाला मोबदल्याचा निर्णय झटपट घेणे शक्य होईल, अशी सूचना ६० हून अधिक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांना केली आहे.
‘लोकसत्ता’ मधील वृत्ताचे शिळफाटा मार्गावर मोठे फलक –
मागील तीन महिन्यांपासून ‘लोकसत्ता’ने सातत्याने कल्याण शिळफाटा रस्त्याची दयनीय अवस्था आणि संथगतीने सुरू असलेली काँक्रीटीकरणाची कामे, त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आदींबाबत वृत्त प्रकाशित करून या समस्या समोर आणल्या आहेत. याशिवाय या समस्यामुळे ग्रस्त असलेल्या या भागातील स्थानिक शेतकऱ्यांना शासनाने मोबदला न दिल्याने शिळफाटा रस्त्यालगतच्या १५ गाव हद्दीत रखडलेली रस्ता कामे, शिळफाटा रस्त्यावरची सततची वाहन कोंडी याविषयी सविस्तर वृत्त, लेख लिहिले आहेत. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाची बाजू ‘लोकसत्ता’ने उचलून धरल्याने शासन पातळीवर मोबदला विषयाची दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या संघटनेने शिळफाटा रस्त्यावर ‘लोकसत्ता’ दैनिकामधील शिळफाटा रस्ता संबंधित वृत्त आणि ‘लोकसत्ता’ वृत्तसमुहाचे आभार मानणारे फलक लावले आहेत.
रस्ते बाधित गावे –
ठाणे पालिका हद्द-
सांगर्ली, देसई, खिडकाळी, पडले, डायघर, शीळ.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्द-
कचोरे, नेतिवली, गोळवली, सोनारपाडा, सागाव, माणगाव, घारीवली, काटई, निळजे.
शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने विषय चिघळला –
“शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने शिळफाटा रस्ते रुंदीकरण, काँक्रीटीकरणाचा विषय चिघळला आहे. हे शासनाला कळत असुनही हेतुपुरस्सर शेतकऱ्यांना मोबदला देण्याविषयी शासनस्तरावरुन वेळ काढला जात आहे. हे आता खपवून घेतली जाणार नाही. पहिले मोबदला द्या, मग रस्ते कामासाठी जमिनी घ्या, असा निर्णय बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. गणेशोत्सवानंतर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे.” असे बाधित शेतकरी गजानन पाटील म्हणाले आहेत.