डोंबिवली – शेअर मधील गुंतवणुकीच्या माध्यमातून वाढीव परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून डोंबिवलीतील एका व्यावसायिकाची तीन भामट्यांनी ५६ लाख ६४ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. मे ते सप्टेंबर या गेल्या पाच महिन्याच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
वरूण जोशी, पवन दुबे आणि हरिजत कौर गील आणि इतर तीन बोगस कंपन्यांचे प्रतिनिधी अशी आरोपींची नावे आहेत. यामध्ये गेहलोत मर्चंट, इंडियन मर्चंट, एक्सिस नोव्हा लिमिटेड या बोगस कंपन्यांचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले, गेल्या मे मध्ये तक्रारदार व्यावसायिकाला गुंतवणूक सल्लागार पवन दुबे यांनी संपर्क केला. ऑनलाईन माध्यमातून शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर आपणास अल्प कालावधीत अधिकचा नफा मिळेल असे सांगितले. त्यानंतर दुबे याच्यासह इतर पाच आरोपींनी संगनमत करून मागील पाच महिन्याच्या कालावधी तक्रारदाराला वेगवेगळ्या शेअर्समध्ये अधिक नफा मिळेल या आमिषाने विविध प्रकारच्या जुळण्या पाठवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. केलेल्या गुंतवणुकीवर नफा मिळणे आवश्यक होते.
हेही वाचा : कल्याणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा
पाच महिने झाल्याने व्यावसायिकाने आरोपींकडे वाढीव नफा मागण्यास सुरुवात केली. ते विविध कारणे देऊन नफ्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करू लागले. मूळ रक्कम व्यावसायिकाने परत मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यालाही आरोपींनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा : बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन
आपली दिशाभूल करून स्वताच्या फायद्याकरिता आपली रक्कम आरोपींनी वापरून आपली आर्थिक फसवणूक केली. याविषयीची खात्री पटल्यावर व्यावसायिकाने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.