डोंबिवली – येथील एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनी स्फोटातील मुख्य आरोपी आणि या कंपनीचे मालक मलय प्रदीप मेहता आणि त्याच्या पत्नीला बुधवारी पोलिसांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने दोघांनीही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.मलय मेहता यांच्या पत्नीचाही सहभाग या स्फोट प्रकरणात आढळून आल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी तिला मंंगळवारी अटक केली होती. तिला बुधवारी मलय मेहता यांच्या सोबत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने दोघांना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अमुदान कंपनी स्फोटात तीन मृतदेहांची ओळख पटली आहे. नऊ मृतदेहांची ओळख पटविणे बाकी आहे. तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपींची चौकशीची गरज असल्याने त्यांची कोठडी वाढविण्याची मागणी सरकार पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली. आरोपींंतर्फे ॲड. सम्राट ठक्कर यांनी न्यायालयात बाजू मांडली. कंपनीतील स्फोट तांत्रिक कारणामुळे नाही तर उष्णतेच्या वाढत्या प्रमाणामुळे झाला आहे. हा मानवी अपघात नाही तर एक घडून गेलेली घटना आहे. ही घटना नैसर्गिक आहे, असे दावे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केले.मलय मेहता याची सात दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपली होती. त्यांना बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.