डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत वल्लभभाई पटेल रस्त्यावर प्लाझ्मा रक्तपेढी ते मिराज सिनेमागृह दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याची काँक्रीट रस्त्याची एक बाजू बांधून पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. एकाच आठ फुटाच्या मार्गिकेतून येणारी जाणारी वाहने धावत असल्याने या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे.

पेंडसेनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी हा रस्ता खुला आहे. परंतु, बांधून पूर्ण झालेल्या या काँक्रीट रस्त्यावरून टिळक चौक, पाथर्ली नाका भागातून येणारी वाहने धावतात. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने या रस्त्यावर पेंडसेनगरकडून येणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. त्यामुळे दररोज या अरूंद रस्त्यावर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी होते. पाथर्ली, शेलार नाका भागातून येणारे अनेक वाहन चालक मशाल चौकात उलट मार्गिकेत येऊन तेथून प्लाझ्मा रक्तपेढी समोरील रस्त्यावरून इच्छित स्थळी जातात.

याशिवाय या काँक्रीट रस्त्याच्या बाजुला काही भाजीपाला, फळ विक्रेते आपल्या हातगाड्या घेऊन उभे असतात. वाहन चालकांना आपली वाहने बाजुला घेता येत नाहीत. मागील काही दिवसांपासून या रस्त्यावर ही कोंडी सुरू आहे. या रस्त्याची दुसरी बाजू सीमेंट काँक्रीटची करण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्याची दुसरी बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालक दुसऱ्या मार्गिकेत आपले वाहन घसरू नये म्हणून अतिशय काळजीपूर्वक या रस्त्यावरून वाहने चालवितात. येणारी जाणारी वाहने अतिशय संथगतीने या रस्त्यावरून धावत असतात. त्यात रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेतील वाहन या रस्त्यावर आले की कोंडीत आणखी भर पडते.

अवजड वाहन चालकही या रस्त्याचा वापर करतात. हे वाहन व्ही. पी. रस्त्यावरून मंजुनाथ शाळा, पाथर्ली चौकापर्यंत जाईपर्यंत व्ही. पी. रस्त्यावर वाहनांचा रांगा लागलेल्या असतात. या सततच्या कोंडीमुळे प्लाझ्मा रक्तपेढी, मिराज सिनेमागृहा समोरील रस्ता वाहन कोंडीने गजबजून गेलेला असतो. या रस्त्यावर आस्थापना केंद्र आहे. विविध प्रकारची कार्यालये याठिकाणी आहेत. या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने उभी करताना याठिकाणी खोदलेल्या रस्त्यामुळे अडथळे येत आहेत.

रस्ते ठेकेदाराला वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक सेवक ठेवण्याची सूचना पालिकेने केली आहे. तरीही याठिकाणी वाहतूक उभे नसतात. सकाळ, संध्याकाळ पाथर्ली मशाल चौक, व्ही. पी. रस्त्यावर काँक्रीट रस्ता पूर्ण होईपर्यंत या रस्त्यावर वाहतूक पोलीस तैनात करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.