भगवान मंडलिक

सागावमध्ये रोज एक हजार लिटर दारूची विक्री; मद्यपींच्या उपद्रवामुळे रहिवासी हैराण

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथे नागरी वस्तीमध्ये गावठी दारूचे चार मोठे अड्डे सुरू आहेत. अस्सल गावठी दारू मिळण्याचे डोंबिवलीतील हे एकमेव मोठे ठिकाण मानले जाते. नव्याने विकसित झालेल्या सागाव भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी ही दारू विक्री सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून या ठिकाणी मद्यपींच्या उपद्रवामुळे स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत.

रात्री साडेदहा वाजल्यानंतर या भागात गावठी दारू प्राशन करुन मद्यपींचा अक्षरश धिंगाणा सुरू असतो, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. महिला, मुली मुंबई परिसरातून नोकरी करून रात्री घरी परततात, तेव्हा त्यांना या दारूडय़ांच्या उपद्रवाला तोंड द्यावे लागते. सागाव म्हणजे पूर्वी चाळी, झोपडय़ा असलेला भाग होता. आता नवीन गृहसंकुले या भागात उभी राहिली आहेत. त्यामुळे या भागात नागरी वस्ती वाढू लागली आहे. असे असताना राजरोसपणे गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याने रहिवाशांमध्ये पोलीस यंत्रणेविषयी कमालिचा संताप आहे. या भागातील एक दारू विक्रेता डोंबिवलीतील एका बडय़ा राजकीय नेत्याचा मेहुणा असल्याची बतावणी केली जात आहे. राजकीय पाठबळामुळे पोलीस वा इतर कोणीही आपणास काही करू शकत नाही असा हा दारू विक्रेता येथील रहिवाशांना सांगत असतो. या दारू विक्रेत्याने घराच्या आवारातच गावठी दारू विक्रीसोबत बिअर, देशी मद्य तसेच खाद्यविक्रीचा स्टॉल मांडून ठेवला आहे. स्थानिक पोलिसांचे वाहन आठवडय़ातून एक ते दोन वेळा या भागातून फे ऱ्या मारते. असे असताना या बेकायदा विक्रीविरोधात कारवाई का होत नाही, असा सवाल रहिवासी करत आहेत. या ठिकाणी नियमित मद्यपी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये हाणामाऱ्या सुरू असतात.

सागावमधील दारू अड्डय़ांपासून, फर्लांगभर अंतरावर उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. अर्धा किमी अंतरावर मानपाडा पोलीस ठाणे आहे. दरम्यान दारू अड्डय़ांविषयी पोलीस कारवाई करीत नाही. या पाश्र्वभूमीवर सागावमधील दारू अड्डय़ांवरील कारवाईसंदर्भात माहिती घेण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना मंगळवारी दोन वेळा संपर्क केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

देसई, मलंगपट्टीतील दारू

सागावमधील दारू अड्डय़ांवर पहाटे, रात्रीच्या वेळेत स्कॉर्पिओ, होन्डा सिटी, ऑडी अशा गाडय़ामधील मागील सामान ठेवण्याच्या जागेतून दारू आणली जाते. दारू फुग्यांमध्ये भरली जाते. हे फुगे गाडीच्या पाठीमागील बाजूस, गाडीतील आसनाखाली भरून मग ते अड्डय़ांवर आणले जातात, असे या भागातील माहीतगाराने सांगितले. बहुतांशी दारू देसई गाव, मलंग पट्टीतील गावांमधून आणली जाते.  फुग्यात २५ ते ३० लीटर दारू असते.

दारू अड्डय़ांवर नियमित कारवाई केली जाते. या ठिकाणच्या विक्रेत्यांबद्दल तक्रारी करण्यात आल्या आहेत. कोणालाही पाठीशी घातले जात नाही.

-अनिल पवार, निरीक्षक, उत्पादन शुल्क, डोंबिवली