डोंबिवली – येथील पूर्वेतील फडके रस्त्याला आगरकर छेद रस्ता आहे. सर्वाधिक वर्दळीचे रस्ते म्हणून हे दोन्ही रस्ते ओळखले जातात. गेल्या सहा महिन्यांपासून आगरकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्यावरील व्यापारी, रहिवासी त्रस्त आहेत.

आगरकर छेद रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना या रस्त्यावर सम, विषम तारखेप्रमाणे दुचाकीस्वार सकाळच्या वेळेत वाहने उभी करून ठेवतात. संध्याकाळी कामावरून परतल्यावर वाहने घेऊन जातात. या वाहनतळामुळेही काँक्रीट रस्ते ठेकेदाराला काम करण्यात अनेक अडथळे येत असल्याचे समजते. फडके रस्त्यालगतचा आगरकर छेद रस्ता हा बाजारपेठेमधील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर व्यापारी पेठ आहे. रुग्णालय आहे. टिळक रस्त्याने येणारी बहुतांशी वाहने सर्वेश सभागृह येथून आगरकर रस्त्याने फडके रस्त्याने नेहरू रस्ता भागात जातात. नेहरू रस्त्याकडून येणारी अनेक वाहने फडके रस्ता छेदून आगरकर रस्त्याने मानपाडा किंवा पी. पी. चेंबर्स माॅल येथून मानपाडा रस्त्याने इच्छित स्थळी जातात. गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे पाचशे ते सहाशे मीटर लांबीच्या आगरकर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हा रस्ता अरूंद आहे. या रस्त्याचे काम सुरू आहे हे माहिती असूनही मुंबईला जाणारा बहुतांशी नोकरदार या रस्त्यावर आपल्या दुचाकी उभ्या करून निघून जातात. त्यामुळे ठेकेदाराला या भागात गटार किंवा बांधकामाची इतर कामे करणे अवघड होत आहे.

हेही वाचा – डोंबिवली : शुक्रवारी फडके रस्ता वाहतुकीस बंद, दिवाळी पहाटनिमित्त ढोलताशा वादनास बंदी

हेही वाचा – मासुंदा तलावाच्या काठी सर्व पक्षीयांची दिवाळी

या रस्त्याच्या एका बाजूला काँक्रीट रस्ता बांधकामाचे साहित्य, दुसऱ्या बाजूला दुचाकींचे अडथळे आहेत. रस्ते बांधकामाचे साहित्य घेऊन येणारी ठेकेदाराची वाहने या रस्त्यावर येणे अवघड होते. दिवसभर हे अडथळे पार करत या रस्त्याचे काम ठेकेदाराला करावे लागत असल्याचे समजते.
या रस्त्याचे काम टप्प्याने केले जात आहे. सरस्वती क्लास, आगरकर सभागृह येथून या कामाला प्रारंभ करण्यात आला. आता या रस्त्याचे काम फडके रस्ता दिशेने सुरू आहे. या रस्ते कामामुळे या रस्त्याच्या दुतर्फा इमारतीमधील रहिवाशांना आपली दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर काढताना मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. रस्ते कामामुळे उडणारा धुरळा घरात, दुकानात येत असल्याने दररोज दुकानाची, घराची स्वच्छता करणे अवघड झाले, अशा तक्रारी येथील व्यापारी, रहिवाशांनी केल्या आहेत. ही कामे एमएमआरडीए करत आहे. त्यामुळे या कामात काही अडथळा येत असेल तर आम्ही त्यांना साहाय्य करतो. या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करावे, असा तगादा आम्ही एमएमआरडीएमागे लावला आहे, अशी माहिती पालिकेच्या एका अभियंत्याने दिली.