डोंबिवली : डोंबिवलीतील वीर मारूती डेव्हलर्पसचे चार विकासक आणि भागीदार यांनी ठाणे, पालघर जिल्ह्याच्या विविध भागातील १४ घर खरेदीदारांची गेल्या दहा वर्षात एक कोटी चार लाख ५३ हजार ९२८ रूपयांची फसवणूक केली आहे. दहा वर्ष झाले तरी विकासक आपणास घराचा ताबा देत नाही म्हणून १४ घर खरेदीदारांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विष्णुनगर पोलिसांनी विकासकांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
वीर मारूती डेव्हलर्पसचे भागीदार कुंदन एकनाथ म्हात्रे (५०), कुणाल भास्कर म्हात्रे, किशोर यशवंत घैसास, वसंत पि. पटेल आणि माजी नगरसेविका अर्चना कुंदन म्हात्रे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विकासक कुंदन म्हात्रे यांनी १४ घर खरेदीदारांना त्यांच्या वीर मारूती डेव्हलपर्सतर्फे डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील कुंभारखाणपाडा येथील कुबेर समृध्दी या तीन विंग असलेल्या गृहसंकुलात घरे देण्याची हमी दिली होती. त्या बदल्यात या खरेदीदारांकडून सहा लाखापासून ते १५ लाखापर्यंत रकमा स्वीकारल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईतील घरे महागडी असल्याने घाटकोपर येथे राहणारे गणेश साबळे यांनी डोंबिवलीत स्वस्तात घर मिळते म्हणून विकासक कुंदन म्हात्रे यांच्या कुबेर समृध्दी गृहप्रकल्पात घर खरेदीसाठी जून २०१४ मध्ये चौकशी केली. ३३ लाखापर्यंत घर मिळत असल्याने गणेश साबळे यांच्यासह इतर १३ खरेदीदारांनी या इमारतीत घर खरेदीसाठी आगाऊ रकमा विकासकांकडे भरणा केल्या आहेत.
कुबेर समृध्दी इमारत १३ माळ्याची सर्व सुविधांनी युक्त असेल. ही इमारत अधिकृत आहे, असे विकासक कुंदन म्हात्रे यांनी घर खरेदीदारांना आश्वासन दिले होते. ऑक्टोबर २०१६ मध्ये घराचा ताबा देण्याची हमी कुंदन यांनी खरेदीदारांना दिली होती. घराची नोंदणी केल्यानंतर फेब्रुवारी २०१५ पर्यंत इमारतीचे काम सुरू होते. त्यानंतर ते बंद पडले. बांधकाम का बंद पडले म्हणून तक्रारदार गणेश साबळे कुंदन यांना विचारणा करत होते. हे काम लवकर सुरू होईल. डिसेंबर २०२२ मध्ये सहाव्या माळ्याचे बांधकाम विकासकांनी पाडून टाकले होते. हे बांधकाम का पाडले, असे खरेदीदार गणेश यांनी विकासक कुंदन यांना विचारणा केली. आपल्याला आता अधिकृत १८ माळ्याची कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या घेऊन अधिकृत इमारत बांधायची आहे. त्यानंतर या बांधकामात १८ माळ्यापर्यंत कोणतीही प्रगती झाली नाही. विकासक घराचा ताबा देण्याचे काही बोलत नाही. घर खरेदीदारांच्या संपर्काला प्रतिसाद देणे कुंदन म्हात्रे यांनी टाळणे सुरू केले. विकासक कुंदन म्हात्रे व भागीदार आपणास घर नाहीच आगाऊ घेतलेली रक्कम देण्याच्या मनस्थितीत नाहीत, हे लक्षात आल्यावर घर खरेदीदार गणेश साबळे यांच्या पुढाकाराने इतर १३ खरेदीदारांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात विकासकांविरुध्द फसवणुकीची तक्रार केली आहे.
हेही वाचा…ठाण्यात हरित कचऱ्याची डोकेदुखी; रस्त्यावर जागोजागी छाटलेले वृक्ष पडून
फसवणूक झालेले खरेदीदार
विश्वेष पाटणकर, डोंबिवली, रश्मीन भगत, मुलुंड, उदय पाटील, डोंबिवली, सुधाकर मोरे, डोंबिवली, प्रवीण पाटेकर, खारेगाव, प्रशांत राणे, कळवा, नीलेश मेतक, ठाणे, सिध्दार्थ माने, पुणे फुरसुंगी, संदेश मयेकर, डोंबिवली, साक्षी पवार , डोंबिवली, नरेश नाचरे, विरार, प्रबीर दास, डोंबिवली, निकेतन डिचोलकर, उल्हासनगर, अमीत परब, डोंबिवली.