ठाणे : डोंबिवली येथे बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारलेल्या ६५ बेकायदा इमारती आणि दिवा शहरातील ५४ बेकायदा इमारती संदर्भातील दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्र यांनी केली. दीपेश म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली. तसेच डुंबरे यांना निवेदन दिले. या प्रकरणात काही भूमाफिया विकासक व संबंधित अधिकाऱ्याच्या संगणमताने गैरव्यवहार घडल्याचा संशय असून निष्पाप नागरिक अनधिकृत इमारतीमध्ये राहण्यास बाद्य झाले आहेत. तर, याप्रकरणातील दोषी मोकाट आहेत असा आरोप दीपेश म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.
डोंबिवली येथे ६५ बेकायदा इमारती उभारून या इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या बेकायदा इमारतींमधील सदनिका सर्वसामान्य नागरिकांना विक्री करण्यात आल्या आहेत. या इमारती बेकायदा असल्याचे उघड झाल्यानंतर आता या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. दिवा शहरातही ५४ बेकायदा इमारती बांधण्यात आल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेचे पथक या इमारतींवर कारवाई करण्यासाठी गेले होते. येथील रहिवाशांनी कारवाईस विरोध केल्यानंतर महापालिका पथक माघारी गेले होते. या प्रकरणांमध्ये नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
या इमारतींच्या प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झाले आहे. ठाकरे गटाचे कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच डुंबरे यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.
या पत्रात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. बनावट सातबारा, खोटे मोजणी नकाशे व बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत. भूमाफिया विकासक आणि संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करावेत. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसावा यासाठी महसूल व महापालिका प्रशासनासोबत समन्वय साधून ठोस उपाययोजना असाव्यात असे या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी आश्वासन दिल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.