कल्याण नियमित कारवाई करुनही वाळू माफिया उल्हास खाडी, काळू नदी पात्रातील बेकायदा वाळू उपसा थांबवित नसल्याने कल्याण तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी ठाणे रेती गट शाखा, दक्षता पथक यांनी संयुक्त कारवाई करुन डोंबिवली मोठागाव, दिवा, मुंब्रा, टिटवाळा, बारावे भागातील वाळू माफियांची २१ लाख रुपये किमतीची सामग्री जाळून टाकली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>ठाणे : दिवाळीत ॲानलाईन खरेदी करताना सावधान

यामध्ये सक्शन पंप, बार्ज गॅस कटरने तोडून, वेल्डिंग यंत्राने बोटी फोडून खाडीत बुडविण्यात आल्या. खाडी किनारी काढलेला वाळू साठा जेसीबीच्या साहाय्याने पुन्हा खाडीत लोटून देण्यात आला. वाळू साठवण हौद जेसीपीच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आले. डोंबिवली भागात वाळू माफियांवर कारवाई सुरू करताच खाडीतील वाळू माफियांनी एकमेकांना इशारे देत कारवाई सुरू असल्याचे संकेत दिेले. त्यामुळे वाळू माफिया सावध झाले होते. तरीही महसूल विभागाच्या पथकांनी बोटीतून वाळू माफियांचा पाठलाग करुन त्यांच्या बोटींना ताब्यात घेतले. आपण पकडले जाऊ या भीतीने मुंब्रा भागात वाळू माफिया बोटीवरुन उड्या मारुन पळून गेले. त्यांचा बोटीने पाठलाग करण्यात आला. काही अवधीत किनारा गाठून ते पळून गेले.
कल्याण जवळील बारावे, टिटवाळा काळू नदी पात्रात, उल्हास नदीत बेकायदा उपशाचे प्रमाण वाढले होते. तेथेही मंगळवारी कारवाई करुन सक्शन पंप, बार्ज जाळून टाकण्यात आले. सात लाख रुपये किमतीचे तीन सक्शन पंप, सहा तराफे जाळून नष्ट करण्यात आले, अशी माहिती तहलीलदार जयराज देशमुख यांनी दिली.

हेही वाचा >>>ठाण्यात सरकारच्या पाठींब्याने शिवसैनिकांवर पोलिसांची दडपशाही

या कारवाईत स्थानिक तलाठी, मंडल अधिकारी सहभागी झाले होते. कोपर पश्चिम भागात वाळू माफियांनी रेल्वे मार्गा लगत वाळू उपसा सुरु करून रेल्वे मार्गाला धोका निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाळू माफियांनी उपसा सुरू करुनही स्थानिक रहिवासी वाळू माफियांना विरोध करत नसल्याने पर्यावरणप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहेत.वाळू माफिया शस्त्रसज्ज असल्याने पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक त्यांना रोखण्यात पुढाकार घेत नाहीत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून वाळू माफियांविरुध्द आक्रमक कारवाई करुनही वाळू माफिया आपले उद्योग थांबवत नसल्याने महसूल विभाग हैराण आहे. आतापर्यंत २० ते २५ कोटीची वाळू माफियांची सामग्री महसूल विभागाने नष्ट केली आहे.

हेही वाचा >>>डोंबिवली : ठाकुर्लीमध्ये वृध्देची लूट

अधिकारी व्यस्त
ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त होते. त्याचा गैरफायदा घेत वाळू माफियांनी बेसुमार वाळू उपसा सुरू केला होता. आता भूसंपादनाच्या प्रक्रिया पूर्ण होऊनही महसूल अधिकारी वाळू माफियांवर कारवाई करत नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.

डोंबिवली परिसरातील वाळू माफियांच्या विरुध्द कारवाई करुन त्यांची उपशाची २१ लाखाची सामग्री नष्ट करण्यात आली. ही कारवाई आता नियमित केली जाणार आहे. वाळू माफियांना पकडून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न आहे. – जयराज देशमुख , तहसीलदार ,कल्याण

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli diva titwala sand mafia destroyed 21 lakh worth of sand material amy