डोंबिवली: डोंबिवली लोकल डोंबिवलीकर प्रवाशांसाठी असली तरी मागील काही महिन्यांपासून मुंब्रा, दिवा भागातील प्रवासी उलट मार्गातून प्रवास करून डोंबिवलीपर्यंत येतात आणि पुन्हा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू करतात. या प्रकारामुळे डोंबिवलीतील प्रवाशांना डोंबिवली लोकलमध्ये उभे राहण्यास जागा मिळत नसल्याने आणि मुंब्रा, दिवा भागातून बसून येणाऱ्या प्रवाशांबरोबर हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढल्याने डोंबिवली लोकल येण्यापूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोन वर दोन दिवसांपासून रेल्वे सुरक्षा बळाचे जवान तैनात राहत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली लोकलमध्ये चढताना फलाटावर कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होऊ नये. प्रत्येक प्रवाशाला धक्काबुक्की न करता लोकलमध्ये चढता यावे. मुंब्रा, दिवा भागातून प्रवासी बसून आले तरी त्यांच्याकडे पास असल्याने त्यांच्या बरोबर डोंबिवलीत बसणाऱ्या प्रवाशांचे वाद होऊ नयेत आणि प्रत्येक प्रवाशाला लोकलमध्ये इच्छित आसनावर बसता यावे, असे नियोजन रेल्वे सुरक्षा बळाच्या डोंबिवली विभागाने सुरू केले आहे.

हेही वाचा… ठाण्याची मेट्रो सहा डब्यांचीच हवी; राज्याचा केंद्राला प्रस्ताव

डोंबिवली लोकल स्थानकात येण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा बळाचे जवान महिला, पुरूष प्रवाशांना रांग लावण्यास सांगतात. स्थानकात डोंबिवली लोकल आली की लोकलमधून सर्व प्रवासी उतरून झाले की मग फलाटावरील प्रवाशांना कोणतीही धांदल न करता लोकल डब्यात चढण्याची मुभा दिली जाते. या प्रकारामुळे प्रत्येक प्रवाशाला दोन दिवसांपासून समाधानाने प्रवास करता येऊ लागला आहे.

हेही वाचा… शिवमंदिर परिसराच्या सुशोभिकरणाला होणार सुरुवात; पुरातत्व खात्याच्या मंंजुरीनंतर १०७ कोटींचे कामाचे कार्यादेश

‘लोकसत्ता’ने गेल्या आठवड्यात ‘डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीकर प्रवासी उपेक्षित’ असे वृत्त दिले होते. त्याची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. कर्जत, कसारा, कल्याण, बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या लोकल दिवा, मुंब्रा भागात थांबत असल्या तरी या स्थानकांमधील तुफान गर्दीमुळे अनेक प्रवाशांना लोकलमध्ये चढता येत नाही. चढायला मिळाले तरी धक्काबुक्की खात, रेटारेटी करत डब्यात जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी दिवा, मुंब्रा भागातील अनेक प्रवासी सीएसएमटी-डोंबिवली लोकलने उलट दिशेने डोंबिवली रेल्वे स्थानकापर्यंत बसून येतात.

हेही वाचा… टेंभीनाक्यावर नवरात्रौत्सवाच्या मंडप उभारणीमुळे कोंडी; वाहतूकीसाठी रस्ता बंद वाहतुक केल्याने चालक हैराण

पुन्हा बसून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. या उलट मार्गी प्रवासामुळे डोंबिवलीतील प्रवाशांचे दिवा, मुंब्रा भागातून येणाऱ्या प्रवाशांबरोबर खटके उडत होते. डोंबिवली लोकल असुनही डोंबिवलीतील प्रवाशांना बसायला जागा मिळत नसल्याची प्रवाशांची खंत होती. दिवा भागातून बसून येणाऱ्या प्रवाशांकडे रेल्वे पास, तिकिटे असल्याने त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक प्रवाशाला लोकलमध्ये सुरक्षितपणे चढता यावे. प्रत्येकाला सोयीप्रमाणे बसायला, उभे राहण्यास जागा मिळाली पाहिजे, या उद्देशातून हे रांगेचे नियोजन डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरू केले आहे, असे रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli division of railway security force has started planning for dombivli local passengers dvr