डोंबिवली – फेरीवाल्यांनी नेहमीच गजबजलेल्या डोंबिवलीतील चिमणी गल्ली, फडके रोड, रॉथ रस्ता तसेच नेहरु मार्गावर गेल्या काही दिवसांपासून एकही फेरीवाला दिसत नसल्याने डोंबिवलीकरांमधून समाधान व्यक्त होत आहे. डोबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील सर्व रस्ते फेरीवाला मुक्त दिसत असल्याने सोमवारी कामानिमीत्त बाहेर पडणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी हा सुखद धक्का होता. महापालिकेच्या नव्या आयुक्त इंदुमती जाखड यांच्या आदेशामुळे प्रभाग अधिकारी अचानक कामाला लागल्याने कधी नव्हे तो डोंबिवली पूर्वेचा परिसर मोकळा श्वास घेताना दिसत आहे.
डोंबिवली पूर्वेतील ग प्रभागात मागील वर्षभर फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक कारवाई सुरू आहे. हातगाडी चालक, पदपथ, रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांवर दंडात्मक, सामान जप्ती आणि फौजदारी कारवाई सुरू आहे. फेरीवाला हटाव पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे, विलास साळवी, सुनील सुर्वे हे तीन पाळ्यांमध्ये कार्यरत राहून ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त राहील याची काळजी घेत आहेत. तरीही हा परिसर फेरीवाला मुक्त झालेला नाही. अशीच कारवाई मागील काही दिवसांपासून फ प्रभागाने फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली, बाजीप्रभू चौक या वर्दळीच्या रस्त्यांवर सुरू केली आहे. फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांच्या मार्गदर्शनावरून ही कारवाई केली जात आहे. नेहमी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजून गेलेल्या चिमणी गल्ली, फडके रस्ता, बाजीप्रभू चौकात एकही फेरीवाला दिसत नसल्याने रस्ते प्रशस्त दिसत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. ग आणि फ प्रभागाने दररोज अशाच प्रकारची कारवाई करून डोंबिवली पश्चिमेप्रमाणे पूर्व भाग फेरीवाला मुक्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.
हेही वाचा – मुंबई : वीज बिल मोबाइल ॲप डाऊलोड केले आणि बँक खात्यातील पैसे गेले
हेही वाचा – मुंबईची तहान भागवण्यासाठी आता समुद्राचे पाणी, नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध
आयुक्तांची पाहणी
महापालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड अचानक रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारून फेरीवाल्यांची पाहणी करत आहेत. गेल्या आठवड्यात डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागाला आयुक्त जाखड यांनी अचानक भेट देऊन या भागातील रस्ते, पदपथांची पाहणी केली होती. त्यावेळी या सर्व रस्त्यांवर फेरीवाले आढळून आले होते. त्यानंतर आयुक्तांनी डोंबिवली पूर्व भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत एकाही आयुक्ताने डोंबिवली पूर्व भागातील फेरीवाले हटविण्याचा कधीच प्रयत्न केला नव्हता. आयुक्त जाखड यांच्या कठोर शिस्तीमुळे आता अधिकारी कामाला लागले आहेत.